कोल्हापूर मनपा हद्दीतील पंचगंगा नदीच्या पूररेषेची शास्त्रीय पद्धतीने आखणी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

पंचगंगा नदीच्या पहिल्या टप्प्यातील 16.30 कि.मी लांबीमध्ये शिवाजी पूल ते राष्ट्रीय महामार्गावरील पूल या भागातील ब्लू लाईन व रेड लाईनचे सर्वेक्षण जलसंपदा विभागाने केले होते.

मुंबई । कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील पंचगंगा नदीच्या पूर रेषेची शास्त्रीय पद्धतीने आखणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पंचगंगा नदीच्या पूर रेषेच्या आखणीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पहिल्या टप्प्यातील 16.30 कि.मी लांबीमध्ये शिवाजी पूल ते राष्ट्रीय महामार्गावरील पूल या भागातील ब्लू लाईन व रेड लाईनचे सर्वेक्षण जलसंपदा विभागाने केले होते. तथापि या सर्वेक्षणाला क्रेडाई संस्था व कोल्हापूर असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट यांनी आक्षेप घेतला होता. यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. पूर रेषेचा फ्लड फ्रिक्वेन्सी अॅनेलॅसिस ही शास्त्रीय पद्धत वापरुन फेर सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यास आयआयटी पवई यांनी प्रमाणित केले आहे.

ज्या पूररेषेच्या भागात यापूर्वीच बांधकामे झाली आहेत, किंवा मंजुरी दिली आहे. तसेच जे क्षेत्र ना विकास विभागात येणार आहे, त्या जागामालकांचे नुकसान होऊ नये यासाठी जलसंपदा विभाग व नगरविकास विभागाने समन्वयाने स्वतंत्रपणे प्रकरण निहाय निर्णय घ्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कोल्हापूर महानगर पालिकेने जलसंपदा विभागाकडून पूर रेषेबाबत मागणी घेऊन ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून घ्यावे व त्याचा उपयोग विकास आराखडा तयार करताना करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या बैठकीला जलसंपदामंत्री गिरीष महाजन, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार, प्रकल्प सचिव सं.कृ घाणेकर, ज्येष्ठ संपादक प्रतापराव जाधव, क्रेडाई या संस्थेचे अध्यक्ष राजीव पारिख व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.AM News Developed by Kalavati Technologies