मुंबई । मुंबईत 200 किलो ड्रग्स जप्त केल्याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी)ने राज्याचे कॅबिनेटमंत्री नवाब मलिक यांचे जावाई समीर खान यांना समन्स पाठवलं आहे. समीर खान यांचे लग्न मलिक यांची मुलगी निलोफर हिच्यासोबत झालं आहे. एनसीबीचं म्हणणं आहे की, समीर खान आणि करन सजनानी यांच्यात 20 हजार रुपयांची देवाण-घेवाण झाली आहे. समीर याने गुगल पेव्दारे 20 हजार रुपये करन सजनानी याला दिल्याची माहिती मिळत आहे. ही उलाढाल ड्रग्स प्रकरणी झाली असल्याचं संशय एनसीबीला असल्याने समीर खान यांना समन्स पाठवण्यात आले आहे.
दरम्यान मंगळवारी एनसीबीने मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवाला रामकुमार तिवारी याला ताब्यात घेतले आहे. एनसीबीच्या पथकानं मागील आठवड्यात खार परिसरातून ब्रिटिश नागरिक करण संजानी व राहिल फर्निचरवाला यांना अटक केली होती. त्यांच्याकडून 200 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. समीर खान यांचा संजानी व फर्निचरवाला यांच्याशी नेमका काय संबंध आहे? संजानी यांच्याशी समीर यांच्यात 20 हजार रुपयांची देवाणघेवाण का झाली होती?,' याची चौकशी एनसीबी करणार आहे.