उल्हासनगरात 5 मजली इमारत कोसळली, एक दिवसआधीच रिकामी केल्याने 100 जणांचे वाचले प्राण

प्रशासकीय अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत.

मुंबई । उल्हासनगरात पाच मजली 'महक' इमारत मंगळवारी (13 ऑगस्ट) सकाळी 10 वाजता कोसळली. एका दिवसापूर्वीच (सोमवारी) ही इमारत रिकामी करून सील करण्यात आली होती. या इमारतीत 31 कुटुंबांत तब्बल 100 जण राहत होते. त्यांना बाहेर काढण्यात आले होते. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. प्रशासकीय अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत.

उल्हासनगर येथील लिंकरोड परिसरात असलेल्या 'महक' या पाचमजली इमारतीला सोमवारी सकाळी तडे गेल्याचे निदर्शनास आले होते. इमारत एका बाजूला झुकल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांनी तत्काळ याबाबत अग्निशमन दलाला माहिती दिली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेत या इमारतीतील 31 कुटुंबांना घरे रिकामी करण्याचे आदेश देऊन इमारत सील केली होती. मात्र, महक इमाकत धोकादायक इमारतींच्या यादीत नसतानाही या इमारतीला तडे गेल्याने इमारतींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.AM News Developed by Kalavati Technologies