परतीच्या पावसाने घेतला विद्यार्थ्याचा बळी, औशात बारावीच्या विद्यार्थ्याची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

शिक्षणासाठी लागणा-या पैशाची तडजोड पित्याकडून होत नसल्याने श्रीधर पाटील हा आर्थिक विवंचनेत होता

लातूर । परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने पित्याकडे शिक्षणाचा खर्च उचलण्याची क्षमता नसल्याच्या कारणावरून आर्थिक विवंचनेत अडकलेल्या बारावीतील श्रीधर श्रीकृष्ण पाटील या विद्यार्थ्याने औसा येथे राहत्या खोलीतच गळफास घेऊन आत्महत्या केली. श्रीधर हा औसा येथील एका महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता.

दरम्यान, शिक्षणासाठी लागणा-या पैशाची तडजोड पित्याकडून होत नसल्याने श्रीधर पाटील हा आर्थिक विवंचनेत होता. दिवाळीच्या सुटीनिमित्त तो गावाकडेही गेला होता. पित्याकडे शिक्षणाचा खर्च, परीक्षा शुल्क, खासगी शिकवणीचे शुल्क आणि रूम भाड्यापोटी पैशाची मागणी केली होती. दरम्यान, पित्याकडे शैक्षणिक खर्चाचा भार उचलण्याची क्षमता राहिली नव्हती. दुष्काळ, सततची नापिकी अन् परतीच्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. त्यावेळी पित्याने शिक्षणासाठी आपल्याकडे पैसे नाहीत, शिक्षणाचा खर्च उचलणे आता शक्य नसल्याचे सांगितले. यावेळी हताश झालेल्या श्रीधर पाटील या विद्यार्थ्याला पुढील शिक्षणाची समस्या भेडसावत होती. वडिलांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती तर शेतीत असलेले पीकही पावसामुळे संपुष्टात आले होते.AM News Developed by Kalavati Technologies