माळशिरस तालुक्यात धुक्याचे साम्राज्य, पिकांवर रोगांचे संक्रमण होण्याची शक्यता

परतीच्या पावसाने हवालदिल झालेला शेतकरी आता आणखीच काळजीत पडला आहे.

सोलापूर | सध्या हवामानात वेगवेगळे बदल होताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात मात्र सकाळी दाट धुक्याचे साम्राज्य पसरत आहे. यामुळे गहू, डाळिंबसह अन्य रब्बी व फळबागांवर मोठ्या प्रमाणात रोगांचे संक्रमण होताना दिसतेय. परतीच्या पावसाने हवालदिल झालेला शेतकरी आता आणखीच काळजीत पडला आहे.

सकाळी दाट धुके, दुपारी कडक ऊन आणि रात्रभर बरसणार पाऊस अशा वातावरणात आपले पीक सांभाळणारा शेतकरी अशी काहीशी विचित्र अवस्था सध्या माळशिरस तालुक्यात पाहायला मिळत आहे. दाट धुक्याने येणाऱ्या थंडीची चाहूल करून द्यायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात ऊस तोडणी व ऊसाची नवी लागवड वेगात सुरू होणार आहे. धुके वाढल्यास उगवून आलेल्या उसाच्या पाल्यावर तपकिरी ठिपके पडण्याची शक्‍यता आहे. याचबरोबर ऊस तुटून गेलेल्या खोडव्याच्या उगवणीचेही नुकसान होण्याची शक्‍यता आहे. खोडक्‍यावर बुरशी तयार होऊन ऊसाच्या उगवणीत घट येऊ शकते. याचबरोबर रब्बी पिकांमध्ये जी ज्वारी पोटरीच्या अवस्थेत आहे त्या ज्वारीवर धुक्‍यातून निर्माण होणारे बारीक थेंब साचून कणसाच्या दर्जावरही परिणाम होण्याची भीती आहे.AM News Developed by Kalavati Technologies