कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजकारणाला रामराम, निवृत्त होत असल्याची केली घोषणा

उत्तराधिकारी म्हणून पत्नी संजना जाधव यांना राजकारणात आणणार

औरंगाबाद |  कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज अचानक राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या या घोषणेने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी याबाबतचा एक व्हिडीओ संदेश जारी करुन त्यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. निवृत्तीची घोषणा करताना ते म्हणाले की, सध्या लॉकडाऊन सुरु आहे. अनेकजण आपापले छंद जोपासत आहे. मी देखील माझ्या आध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. त्यातून मला कळलं की, आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो, त्या कितपत खऱ्या आहेत याची जाणीव मला झाली. म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेत आहे, माझी उत्तराधिकारी पत्नी संजना जाधव असेल, असं जाधव यांनी म्हटलंय. अगदी काही दिवसांपुर्वी हर्षवर्धन जाधव यांनी मनसेमध्ये प्रवेश केला होता. राजकीय क्षेत्रात त्यांचे नाव सातत्याने चर्चेत राहिले आहे. जाधव एकदा मनसे तर एकदा शिवसेनेकडून कन्नड मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. गेल्या विधानसभा आणि लोकसभा या दोनही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. लोकसभेत त्यांना 2 लाख 73 हजार 237 मतं मिळाली होती.AM News Developed by Kalavati Technologies