शेतकरी उगीच आत्महत्या करीत नाहीत - शरद पवार

या सरकारने नोटाबंदी करून लोकांना बँकांच्या दारात उभे केले, यामध्ये 100 च्या वर लोकांचे जीव गेले - शरद पवार

अकोला । शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. पण प्रत्यक्षात सरसकट कर्जमाफी झालीच नाही. 21 टक्के लोकांना कर्जमाफी मिळाली. 79 टक्के लोकांना कर्जमाफी मिळालीच नाही, असे सांगत शेतकरी उगीच आत्महत्या करीत नाहीत, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी केले. अकोला जिल्ह्यातील बाळापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सग्रांम गावंडे प्रचारासाठी शरद पवार यांची सभा झाली. त्यावेळी त्यांनी राज्यातील युती सरकारवर टीका केली. राज्यात परिवर्तन होण्याची स्थिती आहे, असेही भाकीत त्यांनी यावेळी केले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले, शेतकऱ्याच्या शेतमालाची किंमत वाढली पाहिजे. हे सरकार मात्र शेतकऱ्यांचे हित पाहत नाही. भाजपच्या राजवटीत कारखानदारी बंद पडली आहेत. तसेच मोदी सरकारच्या 5 वर्षाच्या काळात देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. तरुणांच्या हाताला आज काम नसल्याचे पवार म्हणाले. तसेच या सरकारच्या काळात जेट एअरवेज बंद पडली, त्यामुळे 20 हजार जणांचा रोजगार गेला आहे. या सरकारने नोटाबंदी करून लोकांना बँकांच्या दारात उभे केले, यामध्ये 100 च्या वर लोकांचे जीव गेले. अद्यापही नोटाबंदीच्या झटक्यातून देश सावरला नाही, अशी देखील टीका पवार यांनी यावेळी केली. शेवटी बोलताना त्यांनी तेथील उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले.AM News Developed by Kalavati Technologies