अखेर दुबार पेरणीसाठी बियाणे वाटप; संतप्त शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे महामंडळ झुकले

ज्या शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही त्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे वाटप करण्यात आले.

परभणी | तालुक्यातील सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाबीजच्या कार्यालयासमोर सोमवारी (दि.29) आंदोलन केले. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांसमोर अखेर महाबीजचे अधिकारी झुकले व तात्काळ ज्या शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही त्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे वाटप करण्यात आले. 

परभणी जिल्ह्यात यावर्षी सोयाबीनचा पेरा मोठा प्रमाणात शेतकऱ्यांनी केला होता. मात्र, यातील बहुतांश सोयाबीन हे उगवलेच नसल्याने हजारों शेतकऱ्यांसह विविध पक्ष, संघटनांनी प्रशासनास निवेदन देवून बोगस बियाणे देणाऱ्या कंपन्यांवर कारवाईची मागणी केली होती. सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखाली बियाणे महामंडळ कार्यालयावर आंदोलन केले. यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अधिकाऱ्यांनी बियाणे उगवले नसल्याचे मान्य करीत तात्काळ ज्या शेतकऱ्यांनी महाबीजचे बियाणे घेतले आहेत. त्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून दिली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

आधीच शेतकरी मोठ्या अडचणीत असतांना यावर्षी बियाणे उगवले नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त होता. आता दुबार पेरणी करावी तरी कशी याची चिंता शेतकऱ्यांना लागली होती. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या या आंदोलनामुळे बियाणे उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्य्क्त होत आहे. खासगी कंपन्यांकडून घेतलेले बियाणे सुध्दा शेतक-यांना परत द्यावे, यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी सांगितले.AM News Developed by Kalavati Technologies