दोन्ही पक्ष एकत्र येतीलही, पण यांचे दहा आमदार तरी निवडून येतील का..? - उद्धव ठाकरे

शेतकरी आत्महत्यांचे सत्र हे शरद पवार केंद्रात कृषी मंत्री असताना सुरू झाल्याचे ठाकरे यांनी सांगितले

अहमदनगर । शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आज नगर जिल्ह्यात झंझावाती चार सभांचे आयोजन करण्यात आले होते. पारनेर इथे या मतदारसंघात तीन वेळेस आमदार राहिलेले पक्षाचे उमेदवार आणि विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. कॉग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आम्ही आता थकल्याचे कारण देत काँग्रेस-राष्ट्रवादी च्या एकत्रीकरनाचा मुद्दा पुढे केला. यावर ठाकरे यांनी भाषणात हे दोन पक्ष एकत्र येतीलही, पण यांचे आमदार आता दहा तरी निवडून येणार का असा प्रश्न उपस्थित करत खिल्ली उडवली.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना चांगलेच निशाण्यावर घेतले. काल याच मैदानावर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी घेतलेल्या सभेत युती सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या, 16 हजारावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अशी टीका केली होती. या टीकेला आज उद्धव यांनी याच व्यासपीठावरून उत्तर देत शेतकरी आत्महत्यांचे सत्र हे शरद पवार केंद्रात कृषी मंत्री असताना सुरू झाल्याचे सांगितले. आघाडी सरकारने त्यावेळी घेतलेल्या शेतकरी कर्जमाफी मागे शिवसेनेने त्यावेळी सरकारच्या विरोधात केलेली तीव्र आंदोलने असल्याचा दावा केला. तसेच पिकविम्या बाबत आक्रमक भूमिका घेतल्यानेच यंदा दहा लाख शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळाल्याचे स्पष्ट केले.



AM News Developed by Kalavati Technologies