विधानसभा 2019 : राहुल मोटे यांना तानाजी सावंत यांचं कडवं आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहुल मोटे यांची शांत आमदार अशी प्रतिमा आहे

उस्मनाबाद ।  भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहुल मोटे यांची तिसरी टर्म आहे. या मतदारसंघात विधानसभेला विरोधक म्हणून शिवसेनेकडून विद्यमान जलसंधारण मंत्री तानाजीराव सावंत यांचं कडवं आव्हान असेल. पण युती झाली नाही तर विधानपरिषदेचे आमदार सुजितसिंह ठाकूर भाजपा नेते संजय गाढवे आणि प्रतापसिंह पाटील हे भाजपकडून लढण्यास इच्छुक आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रवीण रणबागुल ईच्छुक उमेदवार असण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहुल मोटे यांची शांत आमदार अशी प्रतिमा आहे. विकास कामांबरोबरच बानगंगा सहकारी साखर कारखाना उभारण्याचं श्रेय त्यांना दिलं जातं. त्यामुळं पुन्हा चौकार मारण्यासाठी ते सज्ज आहेत. राहुल मोटे राणा जगजितसिंह पाटील यांचे नातेवाईक आहेत. पण तसं असलं तरी मतदारांवर त्याचा किती प्रभाव पडेल हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यात मोदी लाटेमुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी पडझड झाल्याचं पाहायला मिळालंय. त्याचा फटकाही मोटे यांना बसण्याची शक्यता आहे.

युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेलाच तर तानाजीराव सावंत यांचं पारडं जड असणारे आहे. शिवजलक्रांतीच्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क वाढलाय. तसंच सोनारीमध्ये त्यांचा साखर कारखाना आहे. तसंच वाशीमध्येही साखर कारखाना आहे. त्यामुळं तानाजी सावंत यांची लोकप्रियता वाढल्याचं पाहायला मिळतंय. दुसरीकडं परंड्याचे माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांची भूमिका आगामी विधानसभा निवडणुकीत परंडा मतदार संघामधे निर्णायक ठरू शकते. उस्मानाबाद काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे, भूमचे विजयसिंहराजे थोरात आणि भुम काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आण्णासाहेब देशमुख तसेच परंड्याचे माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दिवाल यांनी तानाजी सावंत यांच्या नेतृत्वात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळं पक्षाला अधिक ऊर्जा मिळाली.

भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी परंड्याच्या किल्ल्यासाठी निधी, मराठवाड़्यला मिळणाऱ्या पाण्यासाठी प्रयत्न, रस्ते आणि विविध विकासकामांच्या जोरावर जनसंपर्क वाढवल आहे. जिल्ह्यातील भाजपाला बळकटी देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याशिवाय भूम नगरपरीषदेचे माजी नगराध्यक्ष आणि गटनेते संजय नाना गाढवे हेही भाजपाकडून ईच्छुक आहेत. शिवाय पाच वर्षांपासून जिल्हाभरात सक्रिय अशलेले डॉक्टर प्रतापसिंह पाटील हेही भाजपाकडून इच्छुक आहेत. त्यात राणा जगजितसिंह पाटील यांचा प्रभाव असलेल्या वर्गावरही मदार असणार आहे. मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. त्यामुळं सर्वांचच लक्ष वंचित आघाडीकडं आहे.

2014 च्या निवडणुकीत रासप आणि भाजपा युतीचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता. जवळपास 38 हजार मते रासपच्या बाळासाहेब हाडोंग्रीकरांना मिळाली होती. पण यावेळी महायुतीची जागा मिळाली तरच ते लढतील.

मतदारसंघात युती झाली तर लढत तिरंगी पहायला मिळेल आणि युती झाली नाही तर चौरंगी लढत पाहायला मिळेल. रोजगार आणि विकासाच्या मुद्यासह स्थानिक प्रश्नांवर ही निवडणूक गाजू शकते. पण वंचितकडे जाणारी मतं कुणाला महागात पडणार हेही पाहणं रंजक ठरेल. त्यामुळं अनेक गोष्टींवर यंदाची निवडणूक अवलंबून असणार हे नक्की.AM News Developed by Kalavati Technologies