रुग्णवाहिकेअभावी मराठी अभिनेत्रीचा प्रसूतीनंतर मृत्यू, नातेवाईकांचा आरोप

नवजात बालकाचाही मृत्यू

मुंबई । मराठी सिनेकलाकार पूजा झुंजार हिचा रुग्णवाहिकेअभावी प्रसूतीनंतर दुर्देवी मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पूजाच्या नवजात बालकाचाही मृत्यू झाला आहे. पूजा यांना वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांना उशीरा उपचार मिळाले म्हणूनच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेचा प्रश्न पुन्हा नव्याने उपस्थित केला जात आहे. पूजा यांनी ‘फाल्गुनराव जिंदाबाद’, ‘देवी माऊली आम्हा पावली’ या सिनेमांमध्ये काम केले आहे. पूजा या सिने निर्माते विष्णू झुंजार यांच्या पत्नी होत्या.

पूजा गरोदर असल्याने तिच्या घरातील सगळेच खूश होते. ती हिंगोली येथील गोरेगाव जिल्ह्यातील सेनगाव येथे राहत होती. प्रसूती कळा आल्यानंतर तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. पण ग्रामीण भागात आरोग्य सुविधांची वानवा असल्याने तिच्यासह तिच्या नवजात बालकाचा मृत्यू झाला. प्रशासनाच्या हलगर्जीमुळे त्या दोघांना आपला जीव गमवावा लागला असा तिच्या घरातल्यांनी आरोप केला आहे. आरोग्य विभागाच्या ढिसाळ कामगिरीबाबत ग्रामस्थांकडून रोष व्यक्त केला जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies