JNU ला पाठिंबा दिल्यानंतर दीपिका पदुकोणच्या जाहिरातींना बसला फटका

काही जाहिरात कंपन्यांनी चॅनेलवरील दीपिकाच्या जाहिराती दाखवणे कमी केले आहे.

मुंबई | जाहिराती आणि चित्रपटांसाठी सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत दीपिका पदुकोणचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र सध्या अनेक जाहिरातींच्या ब्रॅण्डने तिच्यापासून चार हात लांब राहणेच पसंत केल्याचे वृत्त आहे. दीपिका पदुकोणने नुकतीच जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी विद्यापीठात हजेरी लावली होती. यानंतर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. तसेच तिच्या ‘छपाक’ या चित्रपटाचाही विरोध करण्यात आला. तिच्याविषयी सुरु असलेल्या या वादाचा परिणाम अनेक कंपन्यांवरही झाला आहे. त्या कंपन्या आता सतर्क झाल्या आहेत. त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

काही जाहिरात कंपन्यांनी चॅनेलवरील दीपिकाच्या जाहिराती दाखवणे कमी केले आहे. तर काही कंपन्यांनी वाद मिटेपर्यंत दीपिकाच्या जाहिराती प्रसारित न करण्याचा निर्णय घेतल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे जाहिरातदार कंपन्या आणि दीपिकाला त्याचं मोठं नुकसान सोसावं लागत आहे. यासोबतच येत्या काळामध्ये कलाकारांसोबत कोणताही करार करताना त्यामध्ये एक नवा क्लॉज तयार करण्यात येणार आहे. सामान्यपणे कोणतीही कंपनी त्यांच्या ब्रॅण्डची गुणवत्ता स्थिर रहावी याचा विचार करत असते. त्यामुळे कोणत्याही वादाचा आपल्या कंपनीला फटका बसू नये यासाठी कंपनीकडून सतत प्रयत्न केले जात असतात. असे कोका-कोला आणि अॅमेझॉन सारख्या कंपन्यांना रिप्रेझेंट करणाऱ्या आयपीजी मीडिया ब्रॅण्डसचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी सिन्हा यांनी सांगितलं.

एका ब्रँडने आम्हाला दीपिकाच्या सर्व जाहिराती दोन आठवड्यासाठी रोखण्यास सांगितलं आहे. तोपर्यंत वाद निवळेल अशी आशा आहे, असं मीडिया बाइंग एजन्सीच्या सूत्रांकडून सांगण्यात आल्याचे वृत्त आहे. दीपिका ब्रिटानियाच्या गुड डे, लॉरियल, तनिष्क, विस्तारा आणि अॅक्सिस बँकेसहीत 23 ब्रँड्सच्या जाहिराती करते. या जाहिरातींमधून होणारी तिची निव्वळ मिळकत 103 कोटी एवढी आहे. तिचे ट्विटरवर 2.68 कोटी फॉलोअर्स आहेत. एका सिनेमासाठी ती दहा कोटी रुपये घेते. एका जाहिरातीसाठी 8 कोटी रुपये घेत असल्याची माहिती आहे.AM News Developed by Kalavati Technologies