‘ब्रीद’च्या दुसऱ्या सिझनमध्ये हृषिकेश जोशी सोबतच, झळकणार अभिषेक बच्चन

‘ब्रीद’चा दुसरा सिझन अ‍ॅमॅझॉन प्राईमवर १० जुलैला प्रदर्शित होणार

मुंबई । आर माधवनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ब्रीद’(Breathe) या वेबसिरीजचा पहिला सिझन गाजल्यानंतर आता दुसरा सिझन येत असून त्यामध्ये अभिषेक बच्चनबरोबर हृषिकेश जोशी महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या सिझनमधील हृषिकेशच्या कामाचे सर्व प्रेक्षकांनी तसेच, आर माधवन, मालिकेचे निर्माते-दिग्दर्शक तसेच जगभरातील समीक्षकांनी खूप कौतुक केले. त्यामुळे दुसऱ्या सिझनमध्ये हृषिकेशच्या भूमिकेमध्ये काही अधिकचे चांगले बदल करून ती महत्वाची केली गेली आहे. दुसऱ्या सिझनमध्ये हृषिकेशचा इन्स्पेक्टर प्रकाश अक्षरशः धमाल करणार आहे.

‘ब्रीद' च्या पहिल्या सिझनमध्ये आर माधवन, तर दुसऱ्या सिझनमध्ये अभिषेक बच्चन यांच्या बरोबर दक्षिणेतील आघाडीची अभिनेत्री, नित्या मेनन यांची देखील महत्वाची भूमिका आहे. ब्रीद या वेबसिरीजमध्ये प्रत्येक सिझनला प्रमुख भूमिकेतील व्यक्तिरेखा बदलत जातात. मात्र ज्या दोन ब्रँड व्यक्तिरेखा प्रत्येक सिझनमध्ये कायम राहणार आहेत त्या म्हणजे हृषिकेश जोशी ( इन्स्पेक्टर प्रकाश ) आणि अमित साध (इन्स्पेक्टर कबीर सावंत) यांच्या व्यक्तिरेखा‘ब्रीद 2’हा सिझन अ‍ॅमॅझॉन प्राईमवर १० जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. ॲबंडंशिया एन्टरटेन्मेंटची निर्मिती असलेल्या या वेब सिरीजचा दुसरा सिझन पहिल्या सिझनप्रमाणेच मयांक शर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे. भवानी अय्यर, विक्रम टुली आणि अर्षद सय्यद यांनी या मालिकेचे लेखन केले आहे.

‘ब्रीद -2’या सिझनचे जे ट्रायल शो झाले, त्यावेळी हृषिकेश जोशीच्या इन्स्पेक्टर प्रकाशच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांची खूप मोठी दाद मिळाली. दुसऱ्या सिजनमधील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हालां तिसऱ्या सिझनमध्ये पाहायला आवडतील ? असा प्रश्न एका सर्वेक्षणात प्रेक्षकांना विचारला असता, हृषिकेश जोशीचे नाव पहिल्या दोनात आलेलं आहे.

“मला जेव्हा पहिल्या सिझनसाठी बोलावले गेले तेव्हा माझ्यासाठी वेबसिरीज हे माध्यम नवीन होते. फारशी माहितीही नव्हती. पण हेच आता भविष्य असणार आहे, हे नक्की ठाऊक होते. त्यामुळे हे करायचे असे मी ठरवले. माझी ऑडीशन निर्माते, दिग्दर्शक यांना खूपच आवडली आणि या वेबसिरीजसाठी माझ्याकडून लगेच होकार पण घेण्यात आला. "पहिल्या सिझनला आणि त्यातील माझ्या व्यक्तिरेखेला जो प्रतिसाद मिळाला त्यानंतर निर्मात्यांनी मला बोलावून सांगितले की, माझी व्यक्तिरेखा इथून पुढे सर्व सिझनमध्ये कायम राहणार आहे आणि अधिकाधिक महत्वाची होत जाणार आहे आणि त्यानुसार दुसऱ्या सिझन मध्ये माझ्या व्यक्तिरेखेला धरून गोष्ट लिहिली गेली" असे हृषिकेश सांगतो.

पहिल्या सिझनला संपूर्ण भारतातून तसेच अमेरिका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, आखाती देश येथून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यातील हृशिकेशच्या इन्स्पेक्टर प्रकाशचे तोंड भरून कौतुक केले गेले. अमेरिकेतील सगळ्यांनीच हृषिकेशच्या कामाची प्रशंसा केली तर काही समीक्षकांनी तर खास ट्वीट करून हृषिकेशबद्दल गौरोवोद्गार काढले. आर माधवन यांनी स्वतः ट्वीट करून हृषिकेशच्या कामाची वाहवा केली.

“अलीकडे आम्ही सिझन दोनच्या भागांचे डबिंग करत होतो. त्यावेळी मला अभिषेक बच्चन म्हणाले कि, या सिझनमध्ये सर्वाधिक अटेन्शन कोणती व्यक्तिरेखा घेवून जाणार असेल तर ती तुझी. ते म्हणाले कि, तुझे कॅरेक्टर हे या सीजनमधील सरप्राईझ पॅकेज असणार आहे. माझ्यासाठी ही सर्वात मोठी कॉम्प्लीमेंट होती. या सिझनच्या चित्रिकरणादरम्यान माझी आणि अभिषेक बच्चन यांची खूप चांगली मैत्री झाली. आम्ही एकत्रच जेवायचो, सेटवर खूप क्रिकेट खेळायचो. खूप गप्पा मारायचो. ते खूप गप्पिष्ट आहेत, त्यांना गोड खूप आवडते आणि मलाही. त्यांनी एकदा खास माझ्यासाठी जयाजींनी बनविलेला गाजराचा हलवा आणला होता. त्यांना मराठी कलाकारांबद्दल आणि मराठी रंगभूमीबद्दल प्रचंड आदर आहे,” हृषिकेश सांगतो.

हृषिकेश जोशीने अनेक मराठी चित्रपट, नाटके, मालिका गाजवल्या आहेत. कमीने या हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या व्यक्तिरेखेला चांगलीच पसंती लाभली होती .आजचा दिवस माझा, मसाला, देऊळ , पोस्टर बॉईज , पोस्टर गर्ल , सायकल यांसारख्या अनेक पुरस्कार पटकावणाऱ्या चित्रपटांमध्ये त्याने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तसेच ‘नांदी’ या वेगळ्या नाटकाचे लेखक-दिग्दर्शन त्याने केले आहे. लग्नकल्लोळ , मु. पोस्ट बोंबील वाडी, शोभायात्रा, ए भाऊ डोकं नको खाऊ अशी अनेक नाटके त्यांची गाजली आहे



AM News Developed by Kalavati Technologies