राणीच्या बागेत आता पेंग्विनचा आवाजही ऐकायला मिळणार

तीन वर्षांपूर्वी मुंबईच्या दमट वातावरणात पेंग्विन्सने पहिल्यांदाच पाऊल ठेवले होते.

मुंबई | मुंबईकरांना आतापर्यंत पेंग्विनचे केवळ दर्शन मिळत होते. आता त्यांना त्यांचा आवाजही ऐकता येणार आहे. भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई प्राणिसंग्रहालयामध्ये देशी थाटात राहणाऱ्या ऑलिव्ह, पोपाय, बबल, मिस्टर मॉल्ट, डोनाल्ड, हम्बोल्ट आणि डेझी या परदेशी मित्रपरिवारातील संवाद आता पर्यटकांना प्रत्यक्ष ऐकायला मिळणार आहे. यासाठी पेंग्विनच्या दालनात अद्ययावत ध्वनिप्रणाली बसवण्याचा निर्णय मुंबई पालिकेकडून घेण्यात आल्याचे वृत्त आहे. या निर्णयावर अजूनही अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. तरी लवकरच त्याची घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

तीन वर्षांपूर्वी मुंबईच्या दमट वातावरणात पेंग्विन्सने पहिल्यांदाच पाऊल ठेवले होते. त्यांच्या आगमनानंतर प्राणिसंग्रहालयामधील पर्यटकसंख्येमध्ये वाढ झाली होती. सध्या पेंग्विन राहात असलेला कक्ष ध्वनिरोधक आहे. 18 हजार चौरस फुटांच्या प्रशस्त काचघरात पाण्यात डुंबणारे तर कधी दुडूदुडू धावत बाजूच्या खडकावरील चेंडूंशी खेळणारे पेंग्विन पर्यटकांना केवळ पाहता येतात. आता या सात जणांमधील संवाद ऐकण्याची संधी पालिका उपलब्ध करणार आहे. यासाठी पेंग्विनच्या कक्षामध्ये केवळ आतील आवाज बाहेर येणार आहे. अशी अद्ययावत ध्वनिप्रणाली व माइक लावले जाणार आहेत. प्रेक्षक गॅलरीमध्ये स्पीकरची व्यवस्था केली जाईल. यामुळे पेंग्विनपर्यंत मात्र बाहेरील आवाज जाणार नाही.AM News Developed by Kalavati Technologies