विधानसभा 2019 : गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड निर्माण केली

राज्यात व केंद्रामध्ये शिवसेना सत्तेत असली तरीही तालुक्‍यातील अस्तित्व फक्त कागदावरच

जामनेर । राज्याच्या राजकारणात पकड मजबूत केलेले भाजपचे वजनदार नेते आणि संकटमोचक अशी ओळख निर्माण करणाऱ्या गिरीश महाजन यांचा जामनेर हा मतदारसंघ. जामनेर तालुक्यात गिरीश महाजन यांनी एकहाती वर्चस्व कायम ठेवलं आहे. महाजन सध्या राज्याचे जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत तसंच पालकमंत्रीपदही त्यांच्याकडं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांनी त्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला. पण भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आणि गिरीश महाजन यांच्या समर्थकांनी तालुक्यात गिरीश महाजन यांची ‘वोटबँक’ मजबूत ठेवली आहे. जामनेर नगरपालिकेवरही भाजपची सत्ता असून त्यांच्या सौभाग्यवती साधना महाजन नगराध्यक्ष आहेत.

जामनेर जिल्हा शेतकऱ्यांचा, मजुरांचा, नोकरदारांचा आणि शिक्षकांचा असा प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध अजिंठा लेणीकडं जाण्यासाठी याच तालुक्यातून रस्ता जातो. जामनेर तालुक्यात कपाशी, हरभरा, मका, चवळी, सोयाबीन, उडीद यांचं पिक घेतलं जातं. सर्व घटकांना एकत्र ठेवण्यात गिरीश महाजन यशस्वी ठरलेत.

नुकत्याच झालेल्या भाजपाच्या मेगाभरतीत गिरीश महाजन यांची महत्त्वाची भूमिका होती. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड निर्माण केली आहे. जळगाव मनपा निवडणूक, जिल्हाध्यक्ष निवड, खासदारकीसाठी उमेदवाराची निवड तसेच इतर पदांच्या नियुक्त्यांवर गिरीश महाजनांचा वरचष्मा राहिला आहे. यामुळं जिल्ह्याच्या भाजपवर खडसेंचं वर्चस्व कमी झालं असून ते काहीसे अडगळीत पडल्याचं चित्र दिसून येतं.

गिरीश महाजनांविरोधात 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिगंबर पाटील यांना गिरीश महाजन यांनी ३५ हजार ७६८ मतांनी पराभूत केलं होतं. याशिवाय शिवसेनेचे सुभाष तंवर आणि काँग्रेसच्या ज्योस्त्ना विसपुते यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला होता. पण काँग्रेसला याठिकाणी दारुण पराभव पत्करावा लागला. संजय गरुडदेखील याठिकाणी मातब्बर आहेत. पण काँग्रेसनंतर ते आता राष्ट्रवादीमध्ये गेले आहेत. त्यांना तिकीट मिळाल्यास गिरीश महाजनांना ते कशी टक्कर देणारं हे पाहावं लागेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते फोडण्यात गिरीश महाजन यांना यश आलं आहे. त्यामुळं कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद कमी झाली असल्याचंही चित्र आहे. गिरीश महाजन यांचा पराभव करण्यासाठी सोनिया गांधी यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांनी यापूर्वी सभा घेतली. तरीही गिरीश महाजन अजिंक्य राहिले. गिरीश महाजन यांनी त्यांची एकहाती सत्ता कायम ठेवली असल्याने आताही ते विजयी होतील असे जाणकारांना वाटतं.

राज्यात व केंद्रामध्ये शिवसेना सत्तेत असली तरीही तालुक्‍यातील अस्तित्व फक्त कागदावरच दिसून येतं. दुसरीकडं काँग्रेस आणि राष्ट्रवादीची फक्त धडपड सुरू आहे. अस्तित्व टिकवण्यापलिकडं त्यांना फारसं काही करता आलेलं नाही. उलट त्यांची अनेक कार्यकर्त्यांनी साथ सोडल्याचं पाहायला मिळालं आहे. राष्ट्रवादीचे बडे नेते माजी खासदार ईश्वरलाल जैन हेदेखील महाजनांचं कौतुक करण्यात पुढं असतात. त्याचाही भाजपला फायदा होतो. जामनेर मतदारसंघात रावेर मतदार संघाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे या पाच वर्षात अनेकदा येऊन गेल्यात. विकास कामांचं भूमिपूजन असो वा उद्‌घाटनं आणि पक्षीय पातळीवरील कार्यक्रम यातही त्यांची सक्रियता महत्त्वाची ठरली. त्यांनी विविध गावांमध्ये खासदार विकासनिधी पोचवून आपली छाप सोडल्याचं दिसतं. त्याचाही फायदा भाजप आणि महाजनांना नक्की होईल.

तालुक्यात विविध नेत्यांनी आमदारकीच्या काळात योगदान दिल्याचं पाहायला मिळालं आहे. त्या-त्या वेळी केलेली विकास कामे आणि वाढती लोकसंख्या, जनतेच्या पुढाऱ्यांकडून वाढलेल्या अपेक्षा हाही मुद्दा प्रत्येक निवडणुकीत प्रभावी ठरण्याची शक्यता आहे.AM News Developed by Kalavati Technologies