हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेला 7 हजार 300 कोटी रुपये व्याजासह परत करण्याचा आदेश पुण्याच्या कर्ज वसुली न्यायाधीकरणाने (डीआरटी) अधिकारी दीपक ठक्कर यांनी दिले आहेत. मोदी व त्याच्या कुटुंबीयांनी पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून बँकेला तब्बल 11 हजार 400 कोटी रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणाचा देशातील हा पहिलाच निकाल आहे. बँकेचे कर्मचारी गोकुळ नाथ शेट्टी आणि मनोज हनुमंत खरात यांनी मोदी यांना मदत केल्याचे निकालात नमूद आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या फसवणूक प्रकरणी पुण्यात नीरव मोदी विरोधात दोन खटले सुरू आहेत. पीठासीन अधिकारी दीपक ठक्कर यांच्या समोर हा खटला सुरू असून न्यायाधीकरणाने मोदीवर ताशेरे ओढत त्याला बँकेचे 7 हजार 300 कोटी रुपये व्याजासह परत देण्याचे आदेश दिले आहेत.
मोदीने केलेल्या फसवणुकीच्या विरोधात पंजाब नॅशनल बँकेने कर्जवसुली न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती. सुनावणीत बँकेच्या वकिलांनी आपली बाजू न्यायाधीशांसमोर मांडली. तर मोदी यांच्यावतीने कोणीही न्यायालयासमोर हजर नव्हते. त्यामुळे बँकेच्या वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी या प्रकरणाचा निकाल 6 जुलै रोजी देण्यात येईल, असे स्पष्ट होते.