#OpenSpace: भारत जसा सर्वात जास्त तरुणांचा, तसाच प्रचंड बेरोजगारांचाही देश आहे!

येणाऱ्या या संकटाला सामोरे जाण्यासाठी आपण कितपत तयार आहोत?

परवा अचानक एका मित्राचा फोन आला आणि त्याने सांगितले, रोहन आता राहिला नाही. (रोहन माझा मित्र इंजिनिअर होता) आणि माझे मन सुन्न झाले. खरेतर रोहन हा खूप हुशार आणि आज्ञाधारी मुलगा. पण अनेक महिन्यांपासून जॉबच्या शोधात होता. अलीकडेच काही कामानिमित्त त्याची भेट झाली होती. तेव्हा नेहमी बोलका असणारा रोहन एकदम शांत-शांत दिसत होता. मी न राहवून विचारले काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा त्याने त्याची नोकरीसाठीची पायपीट आणि मरमर माझ्याकडे व्यक्त केली. कुवत आणि क्षमता असूनही त्याला मनासारखा जॉब मिळत नव्हता. त्या कारणाने तो नैराश्यग्रस्त झाला होता. गरीब कुटुंबात जन्मलेला एकुलता एक मुलगा. आई-वडिलांनी जिवाचे रान करत ऐपत नसतानाही मुलाला मोठ्या आशेने शिकवले. जेणेकरून मुलगा चांगल्या नोकरीवर लागेल; आणि आपल्या कष्टाचे चीज होईल. रोहनही आई-वडिलांचे हे कष्ट कधी विसरला नव्हता. मोठ्या जिद्दीनं त्याने आपले शिक्षण 1st class मध्येच पूर्ण केले. पण एवढे असूनही त्याला मनासारखा जॉब नाही मिळाला आणि त्याने शेवटी न राहून आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले.

त्याच्या आत्महत्येनं मनात काही प्रश्न उपस्थित राहिले. योग्यता आणि कुवत असूनही त्याला जॉब का नसेल मिळाला? रोहनसारख्या कित्येक मुलांची आज अशी परिस्थिती असेल? त्याचा दोष काय? या सर्वांच्या खोलात जेव्हा जातो तेव्हा काही गोष्टी स्पष्ट होतात.

नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीला म्हणजेच 1991ला तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह रावांनी (Open Economy) भांडवलशाहीचा स्वीकार केला आणि त्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे औद्योगिक दृष्टीने गेले. Globalization मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. आणि त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती झाली. मोठमोठ्या IT Industries उभ्या राहिल्या. बंगळुरू, पुणे यासारखी शहरे IT Hub म्हणून नावारूपास आली. नव्वदीच्या सुरुवातीलाच देशात प्रायव्हेट टेलिव्हिजन मोठ्या प्रमाणात आपले पाय पसरायला लागल्या. याचाच परिणाम म्हणजे MTV, Star sport आणि अशा अनेक प्रायव्हेट वाहिन्यांनी भारतात आपले मोठे बस्तान बसवले. त्यामुळे मोठमोठ्या जाहिरात कंपन्या उभ्या राहिल्या. यामुळे मोठा रोजगार उत्पन्न झाला. अनेकांना मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या.

एवढेच काय तर नवीन नवीन नोकऱ्यांवर लागलेल्या तरुणांना, रिटायरमेंटला आलेल्या त्यांच्या पालकांपेक्षा जास्त पगार नोकरीच्या सुरुवातीला मिळायला लागला. दुचाकीवर फिरणारा मध्यमवर्ग आता चारचाकी वाहनांमध्ये (विशेषतः मारुती 800 ज्या गाडीला मध्यमवर्गीयांची मर्सिडीझ म्हणून ओळखले जायचे) अशा वाहनांमध्ये फिरायला लागला. याचा परिणाम म्हणजे याच काळात नकळतपणे एकमेकांविरोधात स्पर्धा तयार व्हायला लागली होती. याचाच एक प्रकार म्हणजे माणसाची किंमत त्याच्या नोकरीतील पगारावरून आणि तो वापरात असलेल्या साधन-संपत्तीवरून व्हायला लागली. याचेच रूपांतर पुढे जीवघेण्या स्पर्धेने घेतले. माणसांच्या बेसिक गरजा चांगल्यारीतीने पूर्ण होत असल्या तरी त्याच्याकडे चैनीची साधन-संपत्ती नसल्यास तो समाजात वावरताना मागासलेला असल्यासारखा पाहिला जाऊ लागला.

80च्या दशकाच्या शेवटी-शेवटी माझ्या कित्येक मोठ्या भावांनी इंजिनिअरिंग केली आणि आज मोठ्या कंपनीत चांगल्या नोकरीवर रुजू आहेत; पण नव्वदीच्या सुरुवातीला जे माझे अनेक मित्र इंजिनिअरिंगकडे वळाले त्यांच्याकडे आज नोकऱ्या नाहीत. जे नोकरीवर आहेत ते कुवत असूनही काहीतरी तोडक्या-मोडक्या पगारावर नोकरी करतायत. याचा अर्थ ते हुशार नाहीत असे नाही. पण ज्या नव्वदीच्या सुरुवातीला भारताने भांडवलशाही स्वीकारली आणि अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. पण ती चालना काय नेहमीसाठीच सारखी नव्हती. मध्यंतरी अर्थव्यवस्थेत अनेक चढउतार आणि अनेक clashes आले. त्याचाच परिणाम म्हणजे नोकऱ्या कमी झाल्या आणि शिकणारे तरुण मोठ्या प्रमाणात याच वेळी बाहेर पडले. आणि जेवढ्या प्रमाणात मुले शिकले तेवढ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध नाही झाल्या आणि याचाच परिणाम म्हणजे कमी पैशांत मनुष्यबळ उपलब्ध झाले. यामुळे मिळेल त्या पगारात काम करण्यासाठी शिकलेले मुले उपलब्ध झाली. याचाच फायदा मोठ्या प्रमाणावर भांडवलदारांनी उचलायला सुरुवात केली. आज अनेक ठिकाणी परिस्थितीमुळे मिळेल त्या पगारावर काम करणारी मुले दिसली की दुःख होते.

भारत हा जगातील सर्वात तरुण लोकसंख्या असलेला देश आहे. आणि हीच भारताची सकारात्मकता असल्याचे ढोल गेल्या कित्येक वर्षापासून राज्यकर्ते वाजवत-मिरवत आहेत. पण याच तरुणाईच्या हाताला योग्य काम आणि त्या कामाचा योग्य दाम तरुणाईला मिळण्यासाठी आपण काय करत आहोत. या सर्वांचा विचार ही पांढरपेशी जमात कधी करणार आहे? जगातील सर्वात जास्त तरुण लोकसंख्येचा देश हे ऐकायला सुखावह आहे. जेव्हा त्याच तरुणाच्या हाताला काम नसेल, तेव्हा मात्र या देशाची परिस्थिती अत्यंत भयावह असेल यात यत्किंचितही शंका नाही. कारण तरुणाई म्हटले की जोश आलाच. तरुणाईचा जोश जर देशाच्या भल्यासाठी योग्य प्रकारे वापरला गेला नाही, तर ती मात्र देशासमोरील एक मोठी समस्या निर्माण व्हायला काही वेळ लागणार नाही. आणि याची सुरुवात आता झाली आहे.

येणाऱ्या या संकटाला सामोरे जाण्यासाठी आपण कितपत तयार आहोत? याचा आता विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा आज लागलेला वणवा हा कधी संपूर्ण देश पेटवेल याचा थांगपत्ताही आपल्याला लागणार नाही. आज याच वणव्यात माझा मित्र रोहन गेला. उद्या कोणाचा मुलगा, कोणाचा भाऊ किंवा अन्य कोणाचा मित्र जाईल. याचा ज्याचा त्याने आपल्या परीने विचार करावा आणि उद्याच्या या भयाण वास्तवासाठी तयार राहावे एवढेच.

- सुमीत सरनाईक

(टीप: लेखातील मते लेखकाची वैयक्तिक असून या विचारांशी एएम न्यूज सहमत असेलच असे नाही.)AM News Developed by Kalavati Technologies