'बलात्कारसारख्या घटनेचे राजकारण कसे होते ते हिंदुस्थानकडे पाहून कळते' संजय राऊतांचे भाष्य

संतापाचा अग्नी त्यामुळे शांत झाला. पण बलात्काराचा कलंक दूर झाला काय?"

मुंबई | हैदराबादमधील सामूहिक बलात्कार प्रकरण समोर आले यानंतर संपूर्ण देश हादरला. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान या चारही आरोपींचे एन्काऊंटर करण्यात आले. यावेळी देशा मोट्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. याबाबत आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी 'सामना'तून 'रोखठोक' मत मांडलं आहे. 'बलात्कारसारख्या घटनेचे राजकारण कसे होते ते हिंदुस्थानकडे पाहून कळते' असा संताप व्यक्त करत त्यांनी राजकारण्यांवरही टीकास्त्र साधले आहे.

'बलात्काऱ्यांना हैदराबाद पोलिसांनी गोळ्या घातल्या. लोकांना तेच हवे होते. त्यामुळे ‘पोलीस झिंदाबाद’च्या घोषणा झाल्या. कायद्याचे राज्य कोलमडले. पोलिसांचे राज्य सुरू झाले. ते जास्त पुढे जाऊ नये,' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच राऊत यांनी हैदराबाद बलात्कार प्रकरणाच्या अनुषंगाने देशभरातील स्त्रियांची स्थिती आणि राजकारण यावरही भाष्य केलं आहे.

रोखठोकमध्ये काय लिहिले -
- कायद्याने जे काम होत नाही ते अनेकदा कायदेशीर शस्त्राने होते. चार बलात्कारी नराधमांना हैदराबाद पोलिसांनी ठार केले. पोलिसांच्या कमरेवर लटकणारी पिस्तुले ही शोभेची खेळणी नाहीत हे पोलिसांनी दाखवले. या ‘चकमक’ प्रकरणानंतर देशात पोलिसांचा जयजयकार सुरू झाला आहे. कायद्याचे राज्य आणि पोलिसी राज्य यात फरक आहे. या प्रकरणात कायद्याच्या राज्यावर पोलिसांच्या राज्याने मात केली आहे.
- बलात्कारासारख्या घटनेचेही राजकारण कसे होते ते पाहायचे असेल तर हिंदुस्थानकडे पाहायला हवे. हिंदुस्थानसारखा देश म्हणजे त्याचे उत्तम उदाहरण. दिल्लीत ‘निर्भया’ बलात्कारकांड घडले तेव्हा भारतीय जनता पक्ष विरोधी बाकांवर होता. काँगेस पक्ष राज्यकर्ता होता. निर्भया प्रकरणाचे पुरते भांडवल तेव्हा विरोधकांनी केले. देशातील महिला असुरक्षित असल्याचा ठपका काँगेसवर ठेवला.
- संसदेला बलात्कार, महिला अत्याचाराविरोधात कठोर कायदा करावा लागला. आता हे प्रकरण घडले तेव्हा काँगेस विरोधी बाकांवर आहे व सत्ताधारी भाजप या प्रकरणाची जबाबदारीही घ्यायला तयार नाही. निर्भया ते आता या प्रकरणादरम्यान बलात्काराची शेकडो प्रकरणे घडली; पण मोजकी प्रकरणे लोकांसमोर आली. ‘निर्भया’ कांडानंतर जे कठोर कायदे निर्माण झाले त्या कायद्यांचे शेवटी काय झाले हा प्रश्न आहेच.
- देशात बलात्काराच्या घटनांमुळे समाजव्यवस्था बिघडत आहे. केंद्र सरकारने अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची गरज होती; मात्र बलात्कार रोखण्यासाठी कायदा करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. कठोर कायदा होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार करून दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल रस्त्यावर उतरल्या. पण या बाईंनी एक लक्षात घेतले पाहिजे की, निर्भया प्रकरणानंतर बलात्काराविरोधात कठोर कायदा झाला व मृत्युदंडापर्यंत शिक्षेची तरतूद केली, तरीही बलात्कार सुरूच आहेत.
- कायदा करून बलात्कार व खुनासारखे प्रकार थांबणार नाहीत. ती एक विकृतीच आहे. म्हणूनच हैदराबाद पोलिसांना भररस्त्यावर बलात्काऱ्यांना ठार मारावे लागले. हे का घडते?
हैदराबाद प्रकरण देशात गाजत असतानाच बिहारात त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली. बक्सर जिल्हय़ात एका युवतीवर बलात्कार करून तिला नंतर गोळय़ा घातल्या गेल्या आणि तिचाही मृतदेह जाळला गेला. ही अशी प्रकरणे आता रोजचीच झाली व कायदे करूनही उपयोग नाही.
- भारतीय जनता पक्षाचे राज्य आहे म्हणून बलात्कार वाढले असे कोणी म्हणत नाही. पण संघ विचाराचे लोक बलात्काराची कारणे सांगतात ती हास्यास्पद वाटतात. मुली तोकडे कपडे घालतात हे बलात्काराचे प्रमुख कारण. मुली मुलांशी फारच मोकळेपणाने वागत असल्याचा परिणाम हे दुसरे कारण. हा देश हिंदुराष्ट्र झाल्याशिवाय बलात्कार थांबणार नाहीत हे तिसरे कारण. बलात्कार आणि हिंदुत्वाचा येथे काय संबंध?
- बलात्काऱ्यांना भररस्त्यावर मारा किंवा फासावर लटकवा अशी मागणी होत आहे. श्रीमती जया बच्चन यांनी तर ही मागणी राज्यसभेत केली. पण फाशीचा कायदा केलाच आहे, त्याचे काय करायचे? इस्लामी राष्ट्रांत सध्या बलात्काऱ्यांना ठेचून मारतात, पण तेथेही बलात्कार होतच आहेत. बलात्कार हा विषय फक्त स्त्री संघटनांचा किंवा स्वयंसेवी संस्थांचा नाही. तो तितकाच पुरुषांचाही आहे.
- मुंबईतील स्वयंसेवी संस्था चालवणाऱ्या एक महिला वकील टीव्हीवर या विषयावर जोरजोरात बोलतात; पण वकील म्हणून त्या नेमकी विरुद्ध भूमिका घेतात व महिलांमधील दोषांचे उदात्तीकरण करतात. ‘पेज 3’ संस्कृतीच्या अशा महिलांच्या हाती चळवळीचे नेतृत्व जाते व त्या महिला स्वतःचा व्यवसाय आणि प्रसिद्धीसाठी बलात्कारासारख्या प्रकरणांचा वापर करतात हे मी देशभरात पाहत आहे.
- बलात्कारासारख्या प्रकरणांतही गरीब आणि श्रीमंत अशी दरी मी पाहिली आहे. दोन पायांचे हिंस्र पशू समाजात खूप वावरत असतात. त्यांना लगाम घालणारे न्यायमूर्ती हवेत, साक्ष देणारे डॉक्टर्स हवेत, एक जागृत समाज हवा. पोलिसांचा स्वभाव हैदराबाद प्रकरणातील सर्व आरोपी पकडले गेले आहेत, पण आपली मुलगी बेपत्ता आहे अशी तक्रार घेऊन तिचे पालक गेले तेव्हा पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
- ‘‘कुणाबरोबर तरी तुमची मुलगी पळून गेली असेल. उद्यापर्यंत वाट पाहा.’’ असे उत्तर पोलिसांनी दिले. आता एवढी भयंकर स्थिती असल्यावर बलात्काऱ्यांना फाशीचा कायदा करून काय उपयोग? प्रियंका प्रकरणातील आरोपींना कोर्टात नेण्यात आले तेव्हा खवळलेला जमाव रस्त्यावर उतरला व त्यांनी आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलीस वाहनांवर हल्ला केला, पण हा समाज अबलांच्या मृत्यूनंतर जागा का होतो? तो आधी जागा झाला असता तर निर्भयापासून हैदराबाद पीडितेपर्यंत शेकडो अबलांचे प्राण वाचले असते.
- हिंदुस्थानात सर्वात जास्त बलात्कार होतात व जगात त्यामुळे आपली नाचक्की होते. आम्ही सरकारे बनविण्यात आणि पाडण्यात पुरुषार्थ मानतो; पण सरकारच्या डोळय़ांदेखत महिलांवर बलात्कार होतात. त्यांचे खून होतात. हे षंढत्व आम्हाला अस्वस्थ करीत नाही. कलंक कसा पुसायचा? आपल्या देशात महिला संरक्षणासाठी कायदा करावा लागतो यातच सर्वकाही आले.
- महिला सुरक्षा दिन साजरा करा अशी मागणी संसदेत महिला खासदारांनी केली. महिलांसाठी विशेष संरक्षण देणारे कायदे अमेरिका आणि युरोपसारख्या राष्ट्रांत आहेत काय, हे तपासायला हवे. पाकिस्तानात मलाला या तरुणीवर अतिरेक्यांनी गोळय़ा झाडल्या. दहशतवाद्यांची दहशत झुगारून ती लढण्यासाठी उभी राहिली तेव्हा तिला ठार मारण्याचा प्रयत्न झाला. सारे जग मलालाच्या मागे उभे राहिले.
- मलालाला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. पण हैदराबाद, निर्भयासारखी प्रकरणे सातत्याने हिंदुस्थानात घडताना दिसत आहेत. हे चित्र बदलायला हवे. त्यासाठी समाजाची मानसिकता बदलायला हवी. कायदे कठोर आहेत. मृत्युदंडदेखील आहे, पण उपयोग काय? बलात्कार आणि हत्या झाल्यावर लोक रस्त्यावर उतरतात व आरोपींवर दगड मारतात. इतर वेळी मागच्या पानावरून पुढे सुरूच राहते. काल निर्भया, आज हे प्रकरण, उद्या आणखी कोणी!

- हे सर्व थांबवायचे असेल तर बलात्कारी नराधमांच्या बाबतीत झटपट न्याय हे धोरण स्वीकारायला हवे. यात पोलिसांना अमर्याद अधिकार आहेत व पोलीस अशा नराधमांना सरळ गोळय़ा घालतात. हे प्रकार देशात अनेकदा घडले आहेत. चकमकी खऱ्या की खोट्या यावर वाद झाले व पोलीसही शेवटी तुरुंगात गेले. हैदराबादचे ‘एन्काऊंटर’ वादग्रस्त आणि संशयास्पद आहे. पोलीस आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले. तेथे आरोपींनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांच्या हातातील शस्त्रे हिसकावून घेतली. मुळात आरोपींच्या हातात बेड्या असतील तर त्यांनी शस्त्रे कशी हिसकावून घेतली? सात दिवस पोलिसांच्या ताब्यात राहिलेल्या आरोपींना पोलिसांच्या गराड्यातून पळून जाण्याचे बळ खरेच उरले असेल काय? पण पोलीस म्हणतात, आरोपी पळू लागले म्हणून गोळय़ा घातल्या. पोलिसांनी जे केले त्याला आता समर्थन मिळत आहे. संतापाचा अग्नी त्यामुळे शांत झाला. पण बलात्काराचा कलंक दूर झाला काय?"AM News Developed by Kalavati Technologies