रायगड । पुण्यात सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन शुभारंभ सोहळ्याला पंढरपुरचे सुपुत्र तथा खालापुर तालुक्यातील माणकीवली गावचे जावई शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या कुटुंबियांना आमंत्रण करण्यात आले होते. सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन शुभारंभ सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंढरपुरचे सुपुत्र शहीद मेजर कुणाल गोसावी यांची कन्या तथा खालापुर तालुक्यातील माणकीवली गावची नात उमंग गोसावी हिच्या हस्ते शनिवारी 7 डिसेंबर रोजी राजभवन-पुणे येथील भारतीय लष्कर ध्वजदिन कार्यक्रमा निमित्ताने पार पडला.
देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील तीन दिवशीय परिषदेसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले असता यानिमित्ताने सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन कार्यक्रमासाठी पंढरपूर येथील मरणोत्तर शौर्यचक्र प्राप्त शहिद मेजर कुणाल गोसावी यांचे वीरपत्नी उमा गोसावी आणि त्यांची कन्या उमंग गोसावी यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी वीरकन्या उमंग हिच्या हस्ते भारतीय जवानांच्या अलौकिक कार्यास सलाम असणारा सैनिक फ्लॅग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लावण्यात आला. यावेळी तिचे अभिवादन पंतप्रधान मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी यांनी वीरकन्या उमंग गोसावी हिच्या हस्ते सैनिक कल्याण निधीला आर्थिक मदत करीत सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन शुभारंभ केला. तर कर्नल जाधव यांनी उमंग हिच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना स्मृतीचिन्ह देण्यात आले.