मान्सूनचे शुभवर्तमान ! वरुणराजाचा आठवडाभर राहणार महाराष्ट्रात मुक्काम

महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा अंदाज.

मुंबई । मान्सूनबाबत हवामान विभागाने दिलासा देणारा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाचा महाराष्ट्रात आठवडाभर प्रभाव राहणार आहे. दरम्यान, कोकण, विदर्भ, मराठवाडा याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातही दमदार पावसाचा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरात असलेला कमी दाबाचा पट्टा पुढच्या 48 तासांत तीव्र होऊन यामुळे मध्य भारतात प्रभाव जाणवणार आहे. विदर्भात सोमवारी आणि मंगळवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून तेथे मुसळधार ते तीव्र मुसळधार पाऊस होईल. बुधवारीही विदर्भात सर्वदूर सरी बरसणार आहेत.

कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही जोरदार पाऊस होईल. कोकणात सिंधुदुर्गपासून मुंबई-ठाणे ते पालघरपर्यंत सोमवारी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सोमवारी मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असून मंगळवारी काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस असेल. यानंतर बुधवार आणि गुरुवारी अशाच प्रकारचा पाऊस मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये सोमवार ते गुरुवार हे चारही दिवस मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सोमवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल.AM News Developed by Kalavati Technologies