Good News! आजपासून घरगुती गॅस सिलिंडर झाले स्वस्त, बँकेच्या व्यवहार शुल्कातही बदल

आरटीजीएस-एनईएफटीवर आता शुल्क लागणार नाहीत.

मुंबई । मोदी सरकारने जुलै महिन्याच्या एक तारखेपासून प्रत्येक कुटुंबाची लाइफलाइन असलेल्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये कमाल घट केली आहे. विनाअनुदानित सिलिंडरची किंमत तब्बल 100.50 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. एक जुलैच्या मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू झाले आहेत. दिल्लीमध्ये घरगुती वापराचा सिलिंडर 637 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. तेल कंपन्यांनी ही माहिती दिली. अनुदानित घरगुती सिलिंडरची किंमतही 100.50 रुपयांनी कमी झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी इंडियन ऑइल कॉपोर्रेशनने रविवारी एक पत्रक प्रसिद्ध करून याबाबत माहिती दिली.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमती कमी झाल्या असल्याने तसेच डॉलर-रुपया विनिमय दरांमध्ये बदल झाल्याने एलपीजी सिलिंडरच्या दरामध्ये घट करण्यात आली आहे. आता अनुदानित एलपीजी सिलिंडर घेताना ग्राहकांना नवीन दरानुसार पैसे देता येणार आहेत.

आरटीजीएस-एनईएफटीवर आता शुल्क लागणार नाही

ऑनलाइन व्यवहारात RTGS आणि NEFT द्वारे होणारे पैशांचे व्यवहार आजपासून मोफत झाले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आरटीजीएस आणि एनईएफटी व्यवहारांवर कोणतेही शुल्क घेणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन व्यवहारांना चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी NEFT, तर मोठ्या व्यवहारांसाठी आरटीजीएसचा वापर सामान्यपणे केला जातो.

एसबीआयचे गृहकर्ज रेपो रेटप्रमाणे

भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने आपले गृहकर्जावरील व्याजदर रेपो रेटशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे रेपो रेटच्या बदलानुसार गृहकर्जाच्या व्याजात वाढ किंवा घट होईल. यामुळे सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.AM News Developed by Kalavati Technologies