जालना | जिल्हा शासकीय रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच एका इसमानं उड्डाण पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना जालन्यात घडली आहे. कैलास रामराव तिरुखे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव असून तो जालना तालुका दरेगाव इथला रहिवासी आहे.
मागच्या तीन दिवसांपासून कैलास तिरुखे हे जालन्याच्या घाटी रुग्णालयात उपचार घेत होते. आज दुपारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्यांनी शहरातील शनिमंदिरजवळ असलेल्या ब्रिजवरून उडी घेतली. यात तिरुखे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, कदीम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तिरुखे यांनी आत्महत्या केल्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. याबाबत कदीम पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कैलास तिरुखे यांच्यासोबत रुग्णालयात त्यांचा १३ वर्षीय मुलगा आणि नातेवाईक होते अशी माहिती पोलिसांनी दिली.