आबा!!

कित्येक सुंदर गावे, नावीन्याचा शोध घेणारी माणसे आबांमुळे बघायला मिळाली. त्यांना भेटू शकलो. नागपूर अधिवेशनातील भेटी म्हणजे आनंदाचे जग होते. ते जग हरवले.

आबा, तुम्ही भन्नाट होते. खूप भारी. मैत्र जपण्याचे अजब कसब तुमच्यात होते. आज कंटाळा आला, एक गंमत सांगा? असा फोन आबांचा एका रात्री आला, आणि नंतर-नंतर हसण्याचाही सराव होत गेला. ते कुठे मस्त बोलले की, मी एसएमएस करायचो किंवा कैकदा ते थेट बोलायचेच. बोलण्याची सुरुवात, "काय बे.." या खास वैदर्भीय ठसक्याने होई. पुढचे वाक्य असायचे, मी इतका बोललो कुठे कुठे.. फोन नाही, की म्यासेज नाही. आवडले नाहीत का मुद्दे? बोला की काय म्हणतो विदर्भ? मग गप्पा सुरू होत... त्याला सुमार नसे. का कुणास ठाऊक आबा असे भिनत गेले.

या गोष्टीला दहा वर्षे झाली असतील.. एक दिवस निवडणुकीच्या निमित्ताने ते अमरावतीला मुक्कामी आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी हेलिकॉप्टरने ते नागपूरला निघणार होते. रात्री दहा वाजता त्यांनी त्यांचे तेव्हाचे विशेष कार्याधिकारी श्री. संजय खोडके यांच्यामार्फत निरोप दिला, की तुम्ही सकाळी तयार राहा, आपण नागपूरला सोबत जाऊ! मी आणि माझा मित्र अविनाश दुधे हेलिकॉप्टर असलेल्या अमरावती विद्यापीठाच्या मैदानावर पोहोचलो. सकाळचे साडेआठ झाले होते. आबा आले. त्यांनी हसतच (त्यांचे ते निरामय-निरागस हसू, आजही लख्ख आठवते. काही बारकावे कायम डोक्यात असतात.) विचारले, काय मंडळी नाष्टा झाला, की निघायचे? मी मान हलवून हो म्हणालो. माझ्याकडे लक्ष न देताच, त्यांनी सोबत आलेल्या एकाला म्हटले, दे ते.. त्याने हातातील पिशवी पुढे केली, आबा म्हणाले, 'हे घ्या.. पोहे आणलेत तुमच्यासाठी; मस्त गरम आहेत..!'

आम्ही दोघेही आबांकडे बघत राहिलो. अचंबित करणारे होते सगळे.

"प्रवासात खाऊ...", असे म्हणून हेलिकॉप्टरच्या दिशेने निघालो. पुढच्या सभेतील म्हणजे नागपूरच्या वाडी भागातील सभेतील नेत्यांना त्यांनी फोन करून, आबांनी चालकास सूचना केली. गिरकी घेऊन हेलिकॉप्टर आकाशात उडाले. अमरावती ते वाडी हा प्रवास ४५ मिनिटांचा होता. आमच्या गप्पा सुरू झाल्या. खूप वेगळ्या गप्पा.. पुस्तके, गावे, माणसे, गृहखाते, विविध सामाजिक संघटना, पवारसाहेब, पक्ष, निवडणूक आणि अजितदादा...

तास निघून गेला. वाडी यायचे लक्षण दिसत नव्हते. चालकाला विचारले किती वेळ लागेल. यावर तो म्हणाला, हेलिकॉप्टरचे डॅशबोर्ड काम करत नाही. काहीही समजत नाही. कुठे आहोत याचा अंदाज येत नाही. चालकाच्या या उत्तराने आबांनी खिशातून तंबाखू काढली.. ती खूप वेळ चोळली.. शब्दही न बोलता त्यांनी तणाव कमी केला. आमची चुळबूळ सुरू झाली. हेलिकॉप्टरमध्ये आम्ही चौघेच. उन्हाने डोके वर काढले होते..सूर्याची किरणे आत शिरत होती. वेगळाच उकाडा जाणवत होता. जीव पाणीपाणी करत होता.

आकाशातून खाली रेल्वे रूळ दिसत होते... काही खाणी दिसत होत्या.. काही ठिकाणी लालभडक डोंगर दिसत होते.. तर पात्र अर्धवट असलेलेया नद्या दिसत होत्या. डेरेदार झाडी होती.. लांबसडक रस्ते होते. आकाशातून सगळेच अनोळखी!! एव्हाना पावणेदोन तास झाले होते. आबा चालकावर थोडे चिडले, म्हणाले.. ये क्या भानगड है.. त्यावर त्याचे उत्तर होते, मालूम नहीं सर.!' यावर आबा गप्प बसले. त्यांनी पुनः तंबाखू चोळली. खरेतर, आबांच्या अशा तंबाखू खाण्यावर अजितदादांनी टीका केली होती. त्यामुळे, तंबाखू सोडणार असे आबा म्हणाले होते. हा विषयही आमच्या चर्चेत झाला होता. अजितदादांचे म्हणणे योग्य आहे, असे आबा म्हणाले होते. पण हेलिकॉप्टरच्या भरकटण्याने तणाव दूर करायला तंबाखू हाच इलाज होता. गृहमंत्र्यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी तुम्ही लिहिणार असाल, तर तंबाखूचा विषय टाळा, एवढेच ते म्हणाले. ते का म्हणाले, त्याचा अर्थ खूप वर्षांनी.. त्यांच्या नसण्याने कळला.

आता दीड तास होत आला होता आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री आकाशात भरकटले होते.

भूतलावर सगळी शोध मोहीम सुरू झाली असावी, असा अंदाज आबांनीच बांधला. तो खरा होता. आता एक तास पुरेल इतकेच इंधन हेलिकॉप्टरमध्ये शिल्लक होते. पुरती दाणादाण उडाली होती. आम्ही चंद्रपूर -गडचिरोलीच्या नक्षली सीमेत होतो... पोटात गोळा आला होता. अनेक नेत्यांचे निवडणूक दौरे असल्याने काही मोठ्या गावातील मैदानांवर मोठी वर्तुळे काढून चुन्याने इंग्रजीतील H तिथे काढला होता. असे दोन हेलिपॅड दिसले. आबांनी चालकास प्रश्न केला, की आपण इथे उतरू शकतो का? त्यावर तो नाही म्हणून स्वतःची योजना बनवू लागला. पण ती योजना तत्काळ अंमलबजवणीच्या कैक 'योजने'दूर होती.

मग, आम्हीच परतीची योजना बनवली. आबा म्हणाले काही सुचते का? गर्द हिवराईतून वर जात असताना, नागपूरकडे जाणारा रेल्वेट्रॅक बल्लारपूर स्टेशनची पिवळीकाळी पाटी वरून दिसल्याने शोधला. आणि तिथून ट्रॅक शोधत-शोधत वर्धा स्टेशनपर्यंत आलो. वरून आम्ही सगळे टिपत होतो. मालगाड्या आगपेटीसारख्या दिसत होत्या. त्यातून आमची दिशा नक्की झाली. पुढे, अमरावती- नागपूर महामार्ग आम्ही असाच हुडकून काढला. ट्रक, कार, सगळे दिसत होते. पिटुकले. नागपुरातील काही ओळखीचे कॉलेजेस, मोठ्या इमारती दिसत होत्या. मैदाने दिसत होती. फार उंच नसल्याने रेंज येत होती, तेव्हा काही नेत्यांचे फोन आबा स्वीकारत होते. त्यांना सांगत होते, येतोच लवकर. जरा पाहणी करतो आहे!! रस्ते, इमारती, वाहने, वरून दिसणारे बोर्डस असा साराच आधार घेत आम्ही वाडीपर्यंत पोहोचलो. लोक तिथे फटाके फोडत होते. त्यांच्या गावीही हा थरार नव्हता. इंग्रजीत H लिहिलेल्या वर्तुळात आमचे दिशाहीन हेलिकॉप्टर उतरले.

प्रवास अडीच तासांचा झाला होता. एक थरार संपला होता. मनाने खूप हादरे दिले होते. कानावर घट्ट तळवे ठेवत उतरलो. आबांनी पुन्हा नेहमीचे मंद स्मित केले.. आणि पाठीवर थाप देत दोस्ता, मज्जा आली ना? असे म्हणून ते सभास्थळी निघून गेले.

...मग, आबा अनेकदा भेटत गेले. विविध रूपात. गाड्गेबाबा स्वच्छता अभियानातील बदल असो की तंटामुक्त गावांचे नियोजन असो, आबा बोलवून घ्यायचे. सूचना विचारायचे. अभियानातील माझ्या सहभागामुळे व प्रामुख्याने लोकसहभाग या विषयात मला खूप रस असल्याने महाराष्ट्रातील कित्येक सुंदर गावे, नावीन्याचा शोध घेणारी माणसे मला आबांमुळे बघायला मिळाली. त्यांना भेटू शकलो. नागपूर अधिवेशनातील भेटी म्हणजे आनंदाचे जग होते. ते जग हरवले. नागपूर, मुंबई, दिल्ली.. जिथे जिथे पोटापाण्यासाठी गेलो, तिथे आबा भेटत. ती भेट गप्पा, राजकारण, विनोद आणि समारोप नवीन पुस्तकांच्या भेटीने होई. बहुतेक वेळा ते पुस्तक त्यांनी वाचलेले असायचे. नवीन प्रत ते मला देत. त्या पुस्तक भेटीचे एक अप्रूप मला, कारण आबा त्यावर सही करत नसत तर त्यांना त्या पुस्तकातील आवडलेल्या प्रसंगाचे पान ते दुमडून ठेवत. मराठी रियासतीचे सर्व खंड त्यांनी दिले. अशीच मुशाफिरी होती; शब्द शब्द जोडणारी; निःशब्द होत गेलेली!! त्यांनी दिलेली अशी खूप पुस्तके सोबतीला आहेत. अजब मित्र होते आबा... होते म्हणू की आहेत म्हणू, नाही कळत. मला वाटते, ते आहेत.

रघुनाथ पांडे
कार्यकारी संपादक, एएम न्यूज
+91 9594993515AM News Developed by Kalavati Technologies