निकाल काहीही लागू द्या, हे चित्र डोळ्यांसमोर राहील..

शरद पवारांवरील कविता...

निकाल काहीही लागू द्या,
हे चित्र डोळ्यांसमोर राहील..

याला राजकारण म्हणा..
समाजकारण म्हणा..
विनाकारण म्हणा..
अकारण म्हणा..
काहीही म्हणा..
जे समजायचे असेल ते समजा,
जे म्हणायचे असेल ते म्हणा..
अगदीच म्हणायचे असेल तर,
'त्यांना' लोकांची नस कळते असेही म्हणा..
बॉडीगार्डच्या हातात छत्री असून,
भरपावसात ती उघडली नाही हेही म्हणा..
की, त्यांनी नकोच ती उघडू अशी तंबी दिली असणार असेही म्हणा..
८० वर्षांचा तरुण म्हणा,
की, तरुणाला लाजवेल असा उमदाही म्हणा..
भरसभेत ढोपरापासून हात हलवून,
आगळीक काढली असेही म्हणा..
सग्यासोयऱ्यांच्या प्रश्नावर उगाच चिडणारे,
पवारही म्हणा..
की, राजेंची कॉलर टाइट करणारे
हौशी साहेबही म्हणा..
काहीही म्हणा..
पण हे चित्र डोळ्यांसमोर राहील..!

त्यांना 'टायमिंगचा' बादशहा म्हणा,
गूढ वागणारा राजा म्हणा,
पोटातील पाणी हलू न देणारा जाणताही म्हणा,
की, पाणी पळवणारा बारामतीकरही म्हणा..
असे काहीही म्हणा,
पण हे चित्र डोळ्यांसमोर राहील..!

'ईडी'च्या वारावर,
पवारांचा धमाका म्हणा..
की, धमाक्यातील हवा
दादाच्या रडण्याने गेली म्हणा..
अगदी काहीही म्हणा..
पण हे चित्र डोळ्यांसमोर राहील..!

पायाला भिंगरी लावलेला,
राज्याचा दौरा आठवा..
आणि भरपावसातील,
सातारची सभाही आठवा.!!
धनूभाऊंच्या क्लिपने,
लावलेला ब्रेकही आठवा..
आठवतच आहात तर,
दादा-भाऊंचे 'अनाकलनीय टायमिंग'ही आठवा..
त्यांच्या डोळ्यांतील अश्रूही आठवा,
अश्रूमागील भावना आठवा,
दादा-भाऊंसोबतचेही पवार आठवा..
काहीही म्हणा..
पण हे चित्र डोळ्यांसमोर राहील..

चिंब पावसाची गाणी आठवा,
आठवताच तर मग,
साहेब असे केव्हा कुठे भिजले, तेही आठवा.
पवारांची 'दुष्काळी गाऱ्हाणी' आठवा,
चाराछावणीत भरउन्हातील साहेबही आठवा.
रागलोभापलीकडील नेताही आठवा..
बोलून-बोलून काळवंडलेला अध्यक्षही आठवा,
पायाला दुखापत झालेला बापही आठवा..
संकटावर मात करणारा धैर्यवान आठवा,
की, पळपुट्यांना माफ करून,
शस्त्र उचलणारा योद्धाही आठवा..
नातेगोते- सगेसोयरे,
सारेच आता नक्की आठवा,
डोळ्यांसमोर उभे करून,
'त्यांची' वाढलेली 'पतही' आठवा..
पवार नावाची जादू आठवा,
किल्लारीचा दाता आठवा,
भुजचाही आक्रोश आठवा,
आठवतच आहातच तर पूरही आठवा
आठवणारच असाल तर,
गोवारीही आठवा..
पवार नावाचा वड आठवा..
झुलणाऱ्या पारंब्या आठवा..
त्याने दिलेली सावली आठवा..
कौतुकाची थापही आठवा..
चुकांचीही 'माफी' आठवा..
मनाची 'दिलदारी' आठवा,
तल्लख स्मरणशक्ती आठवा,
खरंच आठवणार असाल तर
त्याच आठवणीत स्वतःलाही आठवा!!
आबा आठवा, दादा आठवा,
ताई आठवा, भाऊ आठवा..
पाटील आठवा, जटिल आठवा,
येवल्याचा 'कृष्ण' आठवा,
परळीचा 'अर्जुन' आठवा,
बुलडाण्याचा 'राम' आठवा,
धाराशिवचे 'राणा'ही आठवा,
विठ्ठलसोबतची 'दिंडी' आठवा,
महाराष्ट्रावरील 'भक्ती' आठवा..
'पुलोद'ची तटबंदी आठवा,
'रालोद'चा संग आठवा..
कऱ्हेचे 'पाणी' आठवा,
वाईची 'कृष्णा' आठवा,
कराडची 'समाधी' आठवा,
भाग्याचा 'यशवंत'ही आठवा..!!
बाळासाहेबांचं 'प्रेम' आठवा,
मैत्रीतील 'जुगार' आठवा,
स्वातंत्र्याची 'अभिव्यक्ती' आठवा..
विश्वासू 'रांग' आठवा,
वर्षावरील 'दान' आठवा,
ऐकू येणारी 'बांग' आठवा,
अंधश्रद्धेचा 'भेद' आठवा,
श्रद्धेतील 'माणूस' आठवा...
सत्तेतील 'पवार' आठवा,
सत्ताबाह्य 'वार' आठवा,
सत्तेसाठी 'जुगाड' आठवा,
शपथेसाठी 'धडपड' आठवा,
शरदाचं चांदणंही आठवा,
क्रिकेटची 'पिच'ही आठवा,
दमदार 'इनिंग' आठवा,
धावचीत होणारे खेळाडू आठवा..
सत्तेचं'महाभारत' आठवा,
रडीचा 'डाव'ही आठवा,
मागून 'वार'ही आठवा,
पुढून 'हात'ही आठवा,
घड्याळाचे 'काटे'आठवा,
रुतलेलं 'फुल' आठवा,
दैवयोग आठवा,
दैवही आठवा..!!
शरपंजरीवरला 'भीष्म' आठवा,
राजकारणातला 'आचार्य' आठवा..
भूखंडाचे 'श्रीखंड' म्हणा,
की प्रसिद्धीचा 'त्रिखंड' म्हणा,
जळी, स्थळी, काष्ठी-पाषाणी,
'पवार' नावाचा घोष आठवा..
काहीही आठवा, काहीही म्हणा,
तरी हे चित्र डोळ्यांसमोर राहील..

साहेबांचे 'हात' आठवा..
टिकटिकणारे 'काटे' आठवा,
शब्दांचे 'भानही' आठवा,
वेळेची 'जाण'ही आठवा,
दातृत्वाची 'शान' आठवा,
श्रमाचे 'साफल्य' आठवा..
राजकीय शक्यतांची 'खेळी' आठवा..
राजकारणाचे फेर आठवा,
घूमजावाची गोष्ट आठवा,
राजकारणाचे 'चरित्र' आठवा,
माणसांचे 'चारित्र्य' आठवा..
गीतरामायणातील 'शरदराव' आठवा,
आता, महाभारत आठवा,
झुंजणारी ती पात्रे आठवा,
यांचेही 'एकपात्री' आठवा..
युद्ध-प्रेमातील नियम आठवा.
जात आठवा, पोटजात आठवा,
मतांची संख्याही आठवा..
आपला आठवा, तुपला आठवा,
आठवतच आहात तर मग,
विजयचा उन्माद आठवा,
झुंजीचा आक्रोश आठवा..
क्षम्य म्हणा की गम्य म्हणा..
की 'दमलो' म्हणणाऱ्यांसाठी बोध म्हणा,
की 'रमलो' म्हणणाऱ्यांसाठी खेद म्हणा..
की पक्षबदलूंवरचा रोखही म्हणा,
असे काहीही म्हणा...
काहीही आठवा, काहीही म्हणा,
तरी हे चित्र डोळ्यांसमोर राहील...

निवडणूक आजची असो वा कालची..
राज्य आघाडीचं असो की युतीचं..
वार शुक्र'वार' असो की सोम'वार'...
चोविस्तास इथे गाजतो फक्त पवार.!!!
निकाल काहीही लागू द्या..
हे चित्र डोळ्यांसमोर राहील..

रघुनाथ पांडे
कार्यकारी संपादक, एएम न्यूज
+91 9594993515AM News Developed by Kalavati Technologies