भारतात काही लोकांना हिंदू या शब्दाची अॅलर्जी आहे - व्यंकय्या नायडू

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह काही विरोधी पक्षांकडून विरोध करण्यात आला आहे.

चेन्नई | नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीच्या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, भारतात काही लोकांना हिंदू या शब्दाची अॅलर्जी असल्याचं वक्तव्य उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी केले आहे. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ कोणत्या एका धर्माचा अपमान किंवा तुष्टीकरण करणे असे नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायदा पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील धार्मिक अत्याचार पीडित अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी असल्याचे व्यंकय्या नायडू म्हणाले.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह काही विरोधी पक्षांकडून विरोध करण्यात आला आहे. याविरोधात देशभरात आंदोलनं केली जात आहे. तर विरोधकांना उत्तर देण्यासाठी भाजपकडून या कायद्याच्या समर्थनार्थ देशभरात विविध ठिकाणी जाहीर सभाही घेण्यात येत आहेत. कायदा हा नागरिकत्व हिसकावून घेण्यासाठी नाही, तर भारतीय नागरिकत्व देण्यासाठी असल्याचे भाजप नेते सांगत आहेत. मात्र विरोधकांचा विरोध जास्तच तीव्र होत आहे. या कायद्यावरून देशभरात राजकीय गदारोळ पाहायला मिळत आहे. त्याचवेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी हा कायदा पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशमधील धर्माच्या नावाखाली अत्याचार झालेल्या पीडित अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देणारा असल्याचे म्हटलं आहे.

चेन्नईच्या श्री रामकृष्ण मठाद्वारे प्रकाशित तमिळ मासिक श्री रामकृष्ण विजयमच्या शताब्दी सोहळा आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यंकय्या नायडू बोलत होते. ते म्हमाले की, भारतात काही लोकांना हिंदू या शब्दाची अॅलर्जी आहे. हे बरोबर नाही. मात्र त्यांना अशा प्रकारचा दृष्टीकोन ठेवण्याचा अधिकार आहे, असं ते म्हणाले. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ अन्य धर्मांचा अपमान करणं नाही. तर धर्मनिरपेक्ष संस्कृती भारतीय आचरणाचा एक भाग आहे, असेही ते बोलताना म्हणाले.AM News Developed by Kalavati Technologies