पाक व्याप्त काश्मीरला भारतात सामावून घेणे हे मोदी सरकारचे पुढचे काम- जितेंद्र सिंह

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे उधमपूर-कठुआ लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत.

नवी दिल्ली | मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतर आता पाकव्याप्त काश्मिराविषयीही चर्चा होऊ लागल्या आहेत. दरम्यान कलम 370 हटवल्यानंतर आता केंद्र सरकारच्या अजेंड्यावर पाक व्याप्त काश्मीर (पीओके) आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सरकारचे पुढचे लक्ष्य हे पीओके भारताचा अभिन्न अंग करण्याचा असल्याचे स्पष्ट केले आहे.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे उधमपूर-कठुआ लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. पीओकेविषयी बोलताना ते म्हणाले की, ही केवळ माझी किंवा माझ्या पक्षाची प्रतिबद्धता नाही. तर 1994 मध्ये पी व्ही नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन काँग्रेस सरकारकडून सर्वसंमतीने संमत करण्यात आलेला हा संकल्प आहे. हा एक स्वीकार्य दृष्टीकोन आहे.

कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. यावर बोलताना जितेंद्र सिंह म्हणाले की, जगातील इतर देश भारताकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत आहेत. काही देश जे भारताच्या भूमिकेबाबत सहमत नव्हते. तेही आता भारताच्या मताशी सहमत झाले आहेत. काश्मीरमधील सर्वसामान्य लोक त्यांना मिळत असणाऱ्या फायद्यांविषयी आनंदी आहेत. तसेच काश्मीरमध्ये आता बंद किंवा संचारबंदी नाही. तिथे फक्त काही निर्बंध घालण्यात आले आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले की, काश्मीरमधील तणावाची परिस्थिती हळुहळू निवळत आहे. इंटरनेट सेवा बंद करण्याबाबत ते म्हणाले की, ही सेवा लवकरात लवकर देण्याची आमची इच्छा आहे. एकदा हा प्रयत्न करण्यात आला पण सोशल मीडियावर बनावट व्हिडिओ टाकले गेले. त्यामुळे या निर्णयाची पुन्हा एकदा समीक्षा करण्यात आली. सरकार हे निर्बंध संपुष्टात आणणे आणि इंटरनेटवरील बंदी हटवण्यासाठी सकारात्मक आहे.AM News Developed by Kalavati Technologies