आरबीआयकडून रेपोरेट दरात कपात; कर्ज हफ्त्यांसाठी आणखी 3 महिने मुदतवाढ

आरबीआयने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये कपात केली आहे.

नवी दिल्ली | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर कर्जधारकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे. घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आता आणखी तीन महिन्यांसाठी मुदत वाढविली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही माहिती दिली आहे. सध्या ज्यांनी कर्ज घेतले त्यांच्यासाठी दिलासा मिळाल्याची बातमी आहे. याशिवाय आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये जीडीपी मध्ये नकारात्मक वाढ  होणार आहे.

याबरोबरच आरबीआयने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये कपात केली आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत सांगितले की, 'रेपो रेट कमी केला जात आहे. आरबीआयने 40 बेसिस पॉईंट कमी केले आहेत. आता रेपो दर चार टक्के आहे. महागाईचा दृष्टीकोन अत्यंत अनिश्चित आहे. रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो दर कमी करून 3.35 टक्के केला आहे. 2020-21 च्या उत्तरार्धात वित्तीय आणि प्रशासकीय उपायांना गती मिळेल अशी अपेक्षा आहे. रेपो दर कमी झाल्यामुळे आता कर्ज स्वस्त होणार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पाच दिवसांची पत्रकार परिषद घेतली. अर्थमंत्री म्हणाले की कोरोनाव्हायरस साथीच्या काळात पंतप्रधान मोदी यांनी अशी घोषणा केली की 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवन देण्यास मदत करेल. त्यानुसार त्यांनी विविध योजनांची माहिती पत्रकारपरिषदेत दिली आहे.AM News Developed by Kalavati Technologies