जगभरात कोरोनाचं थैमान; एक कोटींपेक्षा अधिक संक्रमित रुग्ण, 5 लाखांपेक्षा जास्त मृत्यू

जगातील 200 पेक्षा अधिक देशांमध्ये कोरोनाने कहर केला आहे.

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसने जगभरात मोठं थैमान घातलं आहे. जगातील 200 पेक्षा अधिक देशांमध्ये कोरोनाने कहर केला आहे. दरम्यान जगात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 1 कोटीहून अधिक झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे जवळपास 5 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वृत्तसंस्था एएफपीच्या म्हणण्यानुसार अमेरिकेत अडीच लाखांहून अधिक लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जगभरात जवळपास 10,003,942 संक्रमणाची नोंद झाली असून यामध्ये 498,779 जणांचा मृत्यू झाला आहे.

युरोपमध्ये कोरोनामुळे 1 लाख 95 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे, तर इथल्या संक्रमित रुग्णांची संख्या 26 लाखाहून अधिक आहे. त्याचबरोबर अमेरिकेत 1 लाख 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून संसर्ग झालेल्यांची संख्या 25 लाखाहून अधिक आहे.

गेल्या सहा दिवसांत दहा लाख नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. 21 मेपासून जगभरात कोरोना संक्रमणाचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. गेल्या आठवड्यात एकट्या लॅटिन अमेरिकेत 400,000 हून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर भारतात शनिवारी 18,500 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानं एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 5 लाखांच्या पुढे गेली आहे.AM News Developed by Kalavati Technologies