गडकरी घेणार मोहन भागवतांची भेट, सत्तासंघर्ष सोडवण्यासाठी संघ घालणार लक्ष

नितीन गडकरी आज गुरूवारी नागपूरला जाणार आहेत.

नागपूर | राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. शिवसेना मुख्यमंत्री पदाबाबत अडून बसली आहे तर भाजपकडूनही शिवसेनेच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीयेत. दरम्यान राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता राज्यात निर्माण झालेला सत्तास्थापनेचा पेच सोडविण्यासाठी राष्ट्रीय स्वंयंसेवक संघ लक्ष घालत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेणार आहेत.

नितीन गडकरी आज गुरूवारी नागपूरला जाणार आहेत. ते संघाच्या एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी ते संघ मुख्यालयात जाणार आहेत. तिथेच त्यांची आणि मोहन भागवतांची भेट होणार आहे. महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा जो पेच निर्माण झालाय त्यावर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. भाजपमध्येही सरसंघचालकांचा शब्द हा अंतिम मानला जातो. त्यामुळे ते नितीन गडकरींना काय संदेश देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भागवतांची भेट घेतल्यानंतर ते महायुतीचं सरकार बनावं यासाठी अनुकूल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. आता गडकरी यांना सरसंघचालक काय सल्ला देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गडकरी हे सोमवारपर्यंत नागपूरातच राहतील. गेल्या 10 दिवसांपासून निर्माण झालेला हा पेच सोडविण्यासाठी आता गडकरी पुढाकार घेऊ शकतात. गडकरी यांचे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे कोंडी फोडण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो अशी आशा संघाला आहे.AM News Developed by Kalavati Technologies