कर्नाटकात आतापर्यंत 14 आमदारांचे राजीनामे, आम्ही 'ऑपरेशन कमळ'मुळे नव्हे, तर स्वयंस्फूर्तीने राजीनामे दिल्याचे आमदाराचे वक्तव्य

कुमारस्वामी सरकार संकटात सापडले आहे.

बंगळुरू ।  कर्नाटकात आतापर्यंत 14 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. आमदार एच. विश्वनाथ माध्यमांशी बोलताना म्हणाले की, हे सरकार आम्हाला विश्वासात घेत नाही. आघाडी सरकारने जनतेची पूर्णपणे निराशा केली आहे. यामुळे आम्ही स्वच्छेने राजीनामे दिले. याबाबत आम्ही राज्यपालांचीही भेट घेतली असल्याचे ते म्हणाले. विश्वनाथ पुढे म्हणाले की, आम्ही कोणाच्याही प्रभावाखाली नाहीत, ऑपरेशन कमळमुळे नव्हे, तर स्वयंस्फूर्तीने आम्ही राजीनामे दिले आहेत. दरम्यान, राजीनामे दिलेल्या काँग्रेस व जेडीएसच्या आमदारांनी कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेतली. विधानसभाध्यक्ष मंगळवारपर्यंत त्यांच्या राजीनाम्यावर निर्णय घेणार आहेत.

नाराज आमदारांची नवी अट... सिद्धारमय्या व्हावेत मुख्यमंत्री!

काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारमधील आमदारांच्या राजीनाम्यानंतर कर्नाटकमध्ये नवे राजकीय वळण लागले आहे. हे आमदार राजीनामा देऊ शकतात, असे अंदाज यापूर्वीच व्यक्त करण्यात येत होते. दरम्यान, नाराज आमदारांनी पाठिंबा कायम राहण्यासाठी नवी अट ठेवल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. सिद्धारमय्या मुख्यमंत्री व्हावे अशी त्यांची अट आहे. या पेचप्रसंगातून कुमारस्वामी सरकार कसा मार्ग काढणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. दुसरीकडे, राज्याचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर आणि डी.के. शिवकुमार यांनी बंगळुरूत आमदार आणि नगरसेवकांची बैठक बोलावली आहे. तत्पूर्वी, सोमवारी काँग्रेसचे दोन आमदार रमेश जारकिहोली, आनंद सिंह यांनी राजीनामा दिला होता. कुमारस्वामी सरकार संकटात सापडल्याने राज्यात सत्ता स्थापनेसाठीचा भाजपचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा सुरू होती. परंतु, नाराज आमदारांनी सिद्धारमय्यांना समर्थन व्यक्त केल्याने भाजपच्या स्वप्न फलद्रूप होण्यात अडचणी दिसून येत आहेत.

या आमदारांचा राजीनामा

काँग्रेसचे महेश कुम्थली, बी. सी. पाटील, रमेश जर्कीहोली, शिवराम हेब्बर, प्रताप गौडा, सोमाशेखर, मुनिरत्ना, बिराथी बसवराज, रामालिंगा रेड्डी, तर जेडीएसचे एच. विश्वनाथ, नारायण गौडा, गोपालिया यांनी राजीनामा दिला.

वास्तविक, कर्नाटकात एकूण 224 विधानसभा जागा आहेत. बहुमतासाठी 113 आमदार पाहिजेत. सध्या भाजपकडे 105 आमदार आहेत. तर काँग्रेसकडे 80 आणि जेडीएसकडे 37 आमदार आहेत. अशाप्रकारे दोन्हींजवळ एकूण 117 आमदार आहेत. बहुजन समाज पक्ष (बसपा) आणि अपक्ष आमदारांनीही आघाडीला पाठिंबा दिलेला आहे.

कर्नाटक विधानसभेची सद्य:स्थिती

पक्ष जागा
भाजप 105
काँग्रेस 78
जेडीएस 37
बसपा 1
केपीजेपी 1
अपक्ष 1


AM News Developed by Kalavati Technologies