जैशच्या दहशतवाद्यांची काश्मीरमध्ये घुसखोरी, मोठा घातपात घडवण्याचा कट

जम्मू-काश्मीरचे 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजनही करण्यात आले आहे. नेमक्या याच पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट समोर आला.

नवी दिल्ली | जैश-ए-मोहम्मदच्या सात दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला करण्याच्या उद्देशाने जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी केल्याचे वृत्त आहे. दरम्यान देशात सध्याच्या काळात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरबाबत घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हा अलर्ट महत्त्वाचा समजला जात आहे. घुसखोर दहशतवादी ईद किंवा स्वातंत्र्य दिनाच्या आधी मोठा घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.

भारत सरकारने नुकताच कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारतात दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयनं जैश-ए-मोहम्मदला परवाणगी दिली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी घोषित करण्यात आलेला मसूद अजहर जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या आहे. जास्तीत जास्त जीवितहानी होईल अशा भागांमध्ये हल्ले करा, अशी सूचनाही आयएसआयकडून जैशला करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. घुसखोर दहशतवादी एखाद्या मशिदीवर हल्ला करण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार पोलीस दलातील सूत्रांनी माहिती दिली की, जैशच्या सात दहशतवाद्यांनी बनिहालच्या दक्षिण आणि पीर पंजालच्या पर्वतील भागातून घुसखोरी केली आहे. सध्या हे दहशतवादी राजौरी किंवा पूँछमध्ये लपले असल्याची शक्यता आहे. 'सात दहशतवादी अनंतनाग हायवे आणि त्याच्या आजुबाजूच्या भागात हल्ले घडवू शकतात. त्यांच्याकडून नागरी वस्त्या आणि सुरक्षा दलांची कार्यालये लक्ष्य केली जाऊ शकतात, असा अंदाज दक्षिण काश्मीर दलातील सूत्रांनी वर्तवला. मोदी सरकारकडून गेल्याच आठवण्यात कलम 370 रद्द करण्यात आले. याशिवाय जम्मू-काश्मीरचे 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजनही करण्यात आले आहे. नेमक्या याच पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट समोर आला. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ट्विटरवर प्रचंड सक्रीय झाले आहेत. मुस्लिम देशांना भारताविरुद्ध भडकावण्याचे प्रयत्न ते वारंवार करत आहेत. मोदींच्या नेतृत्त्वाखालील भाजपा सरकारची तुलना त्यांनी थेट जर्मनीतील नाझींशी केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies