न्यायाचा सूड झाला तर त्याचे चारित्र्य संपते - सरन्यायाधीश

न्यायाने कधीही सूडाचे रुप घेता कामा नये

मुंबई । न्यायाने कधीही सूडभावनेचे रुप घेता कामा नये, असे प्रतिपादन सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केले. ते शुक्रवारी जोधपूर येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी हैदराबाद एन्काउंटरच्या पार्श्वभूमीवर सूचक वक्तव्य केले. सरन्यायाधीश बोबडे यांनी म्हटले की, न्याय हा तात्काळ व्हायला पाहिजे किंवा झालाच पाहिजे, असे मला वाटत नाही. तसेच न्यायाने कधीही सूडाचे रुप घेता कामा नये. न्यायाचा सूड झाला तर त्याचे चारित्र्य संपते, असे मत सरन्यायाधीश बोबडे यांनी व्यक्त केले. कोणताही न्याय घाईघाईत करू नये, जर न्याय हा प्रतिशोधाच्या भावनेनं केला गेल्यास त्याचा गाभा नाहीसा होईल. यावेळी कायदामंत्री रविशंकर प्रसादही उपस्थित होते.

हैदराबाद येथे पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार आणि हत्याप्रकरणातील चारही आरोपींचा शुक्रवारी पोलिसांच्या चकमकीत खात्मा झाला. एकीकडे पोलिसांच्या या कारवाईचे मोठे कौतुक केले जात आहे तर दुसरीकडे यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. शनिवारी सर्वोच्च न्यायालयात पोलिसांविरोधात चौकशीची मागणी करणाऱ्या काही याचिका दाखल झाल्या आहेत. शुक्रवारी सकाळच्या सुमारास पोलीस चारही आरोपींना घेऊन 'क्राईम सीन' रिक्रिएट करण्यासाठी गेले होते. याचदरम्यान पळून जाण्याचा प्रयत्न करताना चौघांचा गोळ्या झाडून खात्मा करण्यात आला होता.AM News Developed by Kalavati Technologies