चीनने कुरापत केली तर... संरक्षण मंत्र्यांनी तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांना दिले 'हे' आदेश

संरक्षणमंत्र्यांनी चीनच्या कोणत्याही कारवाईला योग्य उत्तर देण्यासाठी सैन्यास पूर्ण तयारी करण्यास सांगितले आहे.

नवी दिल्ली | भारत आणि चीन दरम्यान झालेल्या पूर्व लडाखमधील गलवान घाटीत झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीनमधील तणाव अद्याप कमी झालेला नसून चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चीनशी सुरू असलेल्या वादावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तीन सैन्य प्रमुख आणि सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासमवेत मोठी बैठक घेतली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. या उच्चस्तरीय बैठकीत लडाखच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी चीनच्या कोणत्याही कारवाईला योग्य उत्तर देण्यासाठी सैन्यास पूर्ण तयारी करण्यास सांगितले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वतीने एलएसीकडून कोणत्याही आक्रमक वर्तनाला सामोरे जाण्यासाठी सैन्य दलाला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते. याशिवाय सुरक्षा दलाला बैठकीत भारतीय सेनेच्या तीनही दलांना चीनच्या सर्व कुरघोड्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सोमवारी तीन दिवसांच्या रशिया दौर्‍यावर रवाना होतील. यावेळी, दुसरे महायुद्धात जर्मनीवरील सोव्हिएत विजयाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त संरक्षण मंत्री मॉस्को येथे लष्करी परेडमध्ये उपस्थित राहतील. मूळत: परेड 9 मे रोजी होणार होती, परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे ते पुढे ढकलण्यात आले होते. भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचा रशियाचा दौरा निर्णायक असल्याचे समजते.

पूर्व लडाखच्या गालवान खोऱ्यात चिनी सैन्यांबरोबर झालेल्या हिंसक चकमकीत भारतीय सैन्याच्या कर्नलसह 20 सैनिक शहीद झाले. त्याचबरोबर या चकमकीत चीनचेही मोठे नुकसान झाले आहे. चीनच्या सैन्य युनिटच्या कमांडिंग ऑफिसरसह 40 सैनिकांना भारतीय जवानांनी ठार केले. पाच दशकांहून अधिक काळातील दोन्ही देशांमधील हा सर्वात मोठा लष्करी संघर्ष आहे. यामुळे दोन्ही देशांमधील सीमेवर आधीपासून सुरू असलेला हा वाद आणखी चिघळला आहे.AM News Developed by Kalavati Technologies