पाकला प्रत्युत्तर; दिल्ली ते लाहोर बससेवाही स्थगित, दोन्ही देशांमधील समझौता एक्स्प्रेसची सेवाही स्थगित

पाकला प्रत्युत्तर; दिल्ली-लाहोर बससेवा रद्द

नवी दिल्ली । दिल्ली वाहतूक महामंडळाने सोमवारी दिल्ली ते लाहोर बससेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडून आधीच ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने नुकताच जम्मू-काश्मीर राज्याला दिलेला विशेष दर्जा रद्द केला. या संदर्भातील 370 कलम रद्द करण्यात आले. त्याचबरोबर जम्मू-काश्मिरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने भारताशी असलेले व्यापारी संबंध तोडले आहेत. दोन्ही देशांमधील समझौता एक्स्प्रेसची सेवाही स्थगित करण्यात आली आहे.

दिल्ली वाहतूक महामंडळाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानकडून बससेवा बंद करण्यात आल्यामुळे दिल्ली वाहतूक महामंडळही सोमवार, 12 ऑगस्टपासून लाहोरला बस पाठवू शकत नाही. पाकिस्तानमधील पर्यटन विकास महामंडळाने गेल्या शनिवारीच दिल्ली वाहतूक महामंडळाला फोनवरून बस वाहतूक बंद करीत असल्याचे सांगितले होते.

पाकिस्तानकडून भारत-पाक यांच्यातील समझोता एक्स्प्रेस बंद करण्यात आली. पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख राशिद यांनी समझोता एक्स्प्रेस रद्द करण्याची घोषणा केली होती. गुरूवारी पाकिस्तानने वाघा बॉर्डरवर ही एक्स्प्रेस थांबवली आणि आपल्या ट्रेनचा ड्रायव्हर आणि गार्डला समझोता एक्स्प्रेससोबत भारतात पाठवण्यास नकार दिला होता. त्यानंतर राजस्थान सीमेमार्फत भारतात येणारी 'धार एक्स्प्रेस' सुद्धा पाकिस्तानकडून बंद करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली होती.

दिल्ली गेट येथील आंबेडकर स्टेडियम टर्मिनलवरून लाहोर-दिल्ली बस चालविली जाते. दिल्ली परिवहन मंडळाच्या (डीटीसी) बसगाड्या दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी, तर पाकिस्तान पर्यटन विकास महामंडळाच्या बसगाड्या मंगळवार, गुरुवार व शनिवारी दिल्लीहून लाहोरला रवाना होतात. दरम्यान, पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध औपचारिकरीत्या संपुष्टात आणले आहेत. पाकिस्तानी राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत तसेच संसदेच्या संयुक्त अधिवेशनात यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत भारतासोबतचे व्यापारी संबंध संपविण्यावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले, असे पाकिस्तानातील आघाडीचे दैनिक ‘डॉन’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.AM News Developed by Kalavati Technologies