दिलासादायक ! देशात 85 टक्के जणांनी केली कोरोनावर मात, गेल्या 24 तासात कमी रुग्णांची नोंद

देशात कोरोनारुग्ण वाढीचा प्रमाण घसरत असून, गेल्या 24 तासात 55,342 जणांना कोरोनाची लागण झाली आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा वेग काही प्रमाणात मंदावला आहे. ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी रुग्णवाढीत मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. सोमवारी 66 हजार 732 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला तर मंगळवारी 55 हजार 342 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 706 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 55 हजार 342 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तर 706 कोरोनाबाधितांची मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 71 लाख 75 हजार 881 एवढा झाला आहे. सध्या देशात 8 लाख 38 हजार 729 जणांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 लाख 9 हजार 856 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 62 लाख 27 हजार 296 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

दरम्यान देशात कोरोनारुग्ण वाढीचा वेग मंदावला असून, रविवारी 74,383, सोमवारी 66,732 आणि आज 55,342 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर मृतांच्या आकड्यात सुद्धा घसरण होत असून, कोरोनामुळे रविवारी 918, सोमवारी 816 तर मंगळवारी 706 जणांचा मृत्यू झाला आहे.AM News Developed by Kalavati Technologies