मुख्यमंत्री स्वत:च्या जन्मगावातील प्रत्येक कुटुंबाला देणार 10 लाख रुपये, राज्याच्या तिजोरीवर 200 कोटींचा बोजा

मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय केवळ त्यांच्या गावापुरता आहे. यावरून मोठा वाद उफाळण्याची चिन्हे आहेत.

हैदराबाद । तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे आपल्या आगळ्यावेगळ्या निर्णयांसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांनी आता घेतलेल्या एका निर्णयामुळे वाद उफाळण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव ज्या चिंतामडका गावात जन्मले तेथील प्रत्येक कुटुंबाला त्यांनी 10-10 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 200 कोटींचा भार पडणार आहे.

मुख्यमंत्री राव म्हणाले की, चिंतामडका या माझ्या जन्मगावातील 2000 कुटुंबांना प्रत्येकी 10-10 लाख रुपये देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या मार्फत ही रक्कम या कुटुंबांना दिली जाईल, असं राव यांनी सांगितलं. विशेष म्हणजे ही घोषणा फक्त मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या जन्मगावापुरतीच करण्यात आली आहे. आपण गावातील लोकांचे ऋणी असून, त्यांचे आभारी आहोत, असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री राव यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. ते म्हणाले की, “राज्य सरकार चिंतामडका गावात राहणाऱ्या 2000 कुटुंबांना 10 लाख रुपये देणार आहे. माझा जन्म सिद्दीपेठ जिल्ह्यातील या गावात झाला. मी चिंतामडाका गावातील लोकांचा ऋणी आहे. ही रक्कम मी तत्काळ मंजूर करणार आहे.”

सीएम चंद्रशेखर राव यांच्या या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 200 कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. चंद्रशेखर राव यांच्या ट्विटवर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावरून त्यांना ट्रोलही केले जात आहे. आपल्या गावातील लोकांचे उपकार फेडायचे असतील तर स्वत:चे पैसे का खर्च करत नाहीत?, असा सवालही काहींनी त्यांना विचारला आहे.AM News Developed by Kalavati Technologies