शिवसेनेला पाठिंब्याबाबत काँग्रेसची स्पष्ट भूमिका; अहमद पटेल- गडकरी भेटीत झाली 'ही' चर्चा, सूत्र

काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार नाहीच! अहमद पटेल-गडकरी भेटीत स्पष्ट, सूत्रांची माहिती

नवी दिल्ली । महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची अजूनही चिन्हे नाहीत. राजकीय पटलावर क्षणाक्षणाला नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. सत्तेत समसमान वाटपावरून शिवसेना आग्रही आहे. तर भाजपही मुख्यमंत्रिपद सोडायला तयार नाही. त्यातच संजय राऊतांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या भेटी वाढवल्याने महाराष्ट्रात एका नव्या शक्यतेची चर्चा व्यक्त केली जात होती. त्यावर शरद पवारांनी पत्रकार परिषदेत खुलासा करून भूमिका स्पष्ट केली आहे.

शरद पवारांनी शिवसेना आणि भाजपने सत्ता स्थापन करायला हवी असे म्हणत आम्ही विरोधातच बसणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी, आज सकाळी काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. इकडे महाराष्ट्रात शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा मिळण्याची चर्चा सुरू असताना पटेलांच्या या भेटीने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार नसल्याचे अहमद पटेल यांनी गडकरींच्या भेटीत स्पष्ट केल्याची सूत्रांची माहिती आहे. सूत्रांनुसार, अहमद पटेल हे काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. त्यांच्या झारखंड व अन्य एका राज्याची जबाबदारी आहे. महाराष्ट्रात शिवसेनेला पाठिंबा दिल्यास त्याचे दूरगामी परिणाम इतर राज्यांत होतील, याची जाणीव ठेवून काँग्रेसने पाठिंब्याला प्रतिकूलता दर्शवली आहे.

दरम्यान, पत्रकार परिषदेत शरद पवारांना अहमद पटेल व गडकरी भेटीवर प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले होते की, अहमद पटेल हे जुनेजाणते नेते आहेत. ते नक्कीच एखाद्या रोडच्या कामासंदर्भात गडकरींना भेटले असतील. याशिवाय त्यांच्या भेटीची आणखी कोणतीही शक्यता नाही, असे आपल्याला वाटत असल्याचे ते म्हणाले.
मग आता शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा नसेलच का, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा स्पष्ट कौल दिला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवली होती. यामुळे आता कोणताही निर्णय घेताना आम्ही एकत्र घेऊत. सध्या तरी आम्ही असा काही विचार केलेला नाही. शिवसेना-भाजपने लवकरात लवकर सत्तास्थापन करावी.AM News Developed by Kalavati Technologies