नवी दिल्ली | राष्ट्रकुल पदक विजेती कुस्तीपटू बबिता फोगाट आणि तिचे वडील महावीर फोगाट हे आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. ती भाजपमध्ये दाखल होणार अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. बऱ्याच दिवसांच्या चर्चेनंतर आता ती भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर येत आहे. वडील महावीर यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना ही माहिती दिली आहे. बबिताच्या कारकिर्दीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
बबिता आणि तिचे वडील महावीर फोगाट हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा होता. आता या चर्चांना महावीर फोगाट यांनी दुजोरा दिला आहे. यासोबतच त्यांनी केंद्रासह राज्य सरकारचं तोंडभरुन कौतुक केले आहे. 'जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करुन मोदी सरकारनं ऐतिहासिक कामगिरी केली. जम्मू-काश्मीरचं दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय अतिशय चांगला आहे. याशिवाय हरयाणात मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार उत्तम काम करत आहे. पारदर्शक प्रशासन देण्याचं काम खट्टर यांनी केले आहे. त्यामुळे आम्ही भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही महावीर फोगाट म्हणाले.
बबिताने हरियाणा पोलीस दलातील निरीक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. फोगाट कुटुंबीयांनी ही माहिती दिली. यापूर्वी महावीर यांनी जननायक जनता पार्टीसाठी काम केलं आहे. जेजेपीच्या क्रीडासंबंधित विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. फोगाट कुटुंब दादरीतील बलाली गावात वास्तव्यास आहे. भाजपा प्रवेशानंतर बबिताला विधानसभा निवडणुकीत बाध्रा किंवा दादरी मतदारसंघातून तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे.