अयोध्या भूमिपूजनाआधी कोरोनाचं संकट; रामजन्मभूमीचे पुजारी प्रदीप दास यांच्यासह 16 पोलिसांना कोरोनाची लागण

रामजन्मभूमी भूमिपूजनाचा कार्यक्रम 5 ऑगस्टला होणार आहे.

नवी दिल्ली | अयोध्यात होणाऱ्या रामजन्मभूमीच्या भूमिपूजन कार्यक्रमावर कोरोनाचे संकट ओढवू लागले आहे. रामजन्मभूमी पुजारी प्रदीप दास यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळते आहे. प्रदीप दास मुख्य याजक आचार्य सत्येंद्र दास यांचे शिष्य आहेत. त्यांच्यासह रामजन्मभूमीच्या संरक्षणामध्ये असलेल्या 16 पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

रामजन्मभूमीत मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांच्यासह चार पुजारी राम लल्लाची सेवा करतात. या चारही पुजार्‍यांपैकी पुजारी प्रदीप दास यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केले आहे.

विशेष म्हणजे रामजन्मभूमी भूमीपूजनाचा कार्यक्रम 5 ऑगस्टला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 200 जण या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कोरोनामुळे भूमिपूजन कार्यक्रमासाठी मोजक्याच लोकांना आमंत्रित केले जाणार आहे.

भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी सुमारे 200 जण मंदिर परिसराच्या 50-50 लोकांच्या वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये उपस्थित असतील. त्यानुसार 50 च्या संख्येमध्ये देशातील महान संत उपस्थित राहतील, 50 च्या संख्येने मोठे नेते आणि चळवळीशी निगडित लोक उपस्थित असतील. यामध्ये लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती आणि कल्याण सिंह यांचा समावेश आहे.

राम मंदिराच्या बांधकामासाठी 5 ऑगस्ट रोजी भूमिपूजन होईल, पण 3 ऑगस्टपासून अयोध्यामध्ये या महोत्सवाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे अयोध्यात दिवाळीसारखे वातावरण तयार होईल. यावेळी प्रशासनाकडून शहरात लाखो दिवे लावण्यात येणार आहेत. तसेच सर्वसामान्यांना त्यांच्या घराबाहेर दिवे जाळण्याचे आवाहनही करण्यात येणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies