केजरीवाल सरकारचा दिल्लीकरांना मोठा दिलासा; डिझेलच्या किंमतीत 8 रुपये 36 पैशांची कपात

दिल्लीत डिझेलचे नवीन दर 73.64 इतके असेल

दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी मोठी घोषणा केली आहे. राजधानीत कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल सरकारने डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत डिझेलवर केवळ 16 टक्के व्हॅट लावण्यात येणार आहे. केजरीवाल सरकारच्या या निर्णयामुळे आता दिल्लीतील डिझेलच्या किंमतीत 8.36 रुपयांची घट होणार आहे.

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीवर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये डिझेल प्रति लिटर 82 रुपये दराने विकले जात आहे, अगोदर डिझेलवर 30 टक्के व्हॅट लावण्यात येत होता. आता हा व्हॅट 30 टक्क्यांवरून कमी करुन 16 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे आता डिझेलच्या किंमतीत 8 रुपयांची कपात होईल, त्यानुसार डिझेलचे दर आता 73.64 रुपये असणार आहेत.

गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले की राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. आता लोक दिल्लीत कामावर परतत आहेत, वातावरण सुधारत आहे आणि कोरोनाची प्रकरणेही कमी होत आहेत. दरम्यान, दिल्लीत प्रथमच डिझेलने 80 रुपयांचा टप्पा ओलांडला होता, तथापि, केंद्राकडून असे सांगितले जात होते की दिल्लीत व्हॅट खूप जास्त आहे, त्यामुळे डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहेत. दरम्यान, आता हा निर्णय दिल्ली सरकारने घेतला असून यामुळे कोरोना संकटात दिल्लीकरांना दिलासा मिळणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies