देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 लाखांच्या पार, गेल्या 24 तासात आढळले सर्वाधिक रुग्ण

मागील 24 तासांत देशात पहिल्यांदाच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 हजारांच्या पुढे गेली आहे.

नवी दिल्ली | देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठी झपाट्यानं वाढत आहे. मागील 24 तासांत देशात पहिल्यांदाच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 हजारांच्या पुढे गेली आहे. यामुळं देशातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 5 लाख 8 हजार 953 इतकी झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात 18 हजार 552 कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली आहे. तर याच कालावधीत जवळपास 384 जणांचा मृत्यूही झाला आहे. आतापर्यंत देशभरात 15 हजार 685 रुग्णांचा कोरोनामुळं बळी गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून 12 ते 15 हजारांनी वाढणारी संख्या अचानक 18 हजारांवर गेली असल्यानं मोठी चिंता निर्माण झाली आहे.

एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांना दुसरीकडं समाधानकारक बाब म्हणजे, उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक झाली आहे. सद्यस्थितीला देशात 1 लाख 97 हजार 387 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 2 लाख 95 हजार 881 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनापासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 57.43 टक्क्यांवर पोहचले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.AM News Developed by Kalavati Technologies