Chandrayaan 2 : होप फॉर बेस्ट! देश तुमच्या पाठीशी, मोदींनी थोपटली इस्रोच्या शास्त्रज्ञांची पाठ

भारताची ही मोहीम अयशस्वी ठरलेली नाही. लँडरशी संपर्क तुटलेला असला तरी ऑर्बिटरद्वारे मोहिमेचा बराचसा भाग पूर्ण करता येणार आहे.

बंगळुरू । भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेत लँडरशी संपर्क तुटला. चांद्रयान यशस्वीपणे चंद्राजवळ पोहोचले, परंतु चंद्र पृष्ठभागापासून अवघ्या 2.1 किमी अंतरावर असताना चांद्रयानाच्या विक्रम लँडरशी इस्रोचा संपर्क तुटल्याने शास्त्रज्ञ काळजीत पडले आहेत.

अजूनही भारताची ही मोहीम अयशस्वी ठरलेली नाही. लँडरशी संपर्क तुटलेला असला तरी ऑर्बिटरद्वारे मोहिमेचा बराचसा भाग पूर्ण करता येणार आहे. सध्या काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असून त्या सोडवण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांकडून पुरेपूर सुरू आहे.

इस्रोच्या माहितीनुसार, लँडरकडून सिग्नल येणं बंद झालं. परंतु लँडरशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऑर्बिटद्वारेही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरीकडे, विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांसह तमाम भारतीय हताश झाले. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांची पाठ थोपटली असून आम्ही तुमच्या सदैव पाठीशी असल्याचं त्यांना सांगितलं.

यावेळी मोदी म्हणाले की, "आयुष्यात चढ-उतार येत असतात. परंतु शास्त्रज्ञांनी केलेल्या या प्रयत्नाला तोड नाही. आपण यातून चांगलेच घेऊ आणि चांगलेच होईल याची आशा करू. तुम्ही या मोहिमेतून जे साध्य केलंय आहे ते यश छोटं नाही. मला आणि देशाला तुमचा अभिमान आहे. तुम्ही (इस्रो) या मोहीमेद्वारे देशासाठी, विज्ञानासाठी आणि मानवजातीसाठी खूप मोठं काम केलं आहे. मी तुमच्यासोबत आहे, हिंमत राखा, तुमच्या प्रयत्नांनी देश खूप आनंदी होईल." AM News Developed by Kalavati Technologies