चांद्रयान-2 अवकाशात झेपावले, भारताने घडवला इतिहास

लाँचिंगची तारीख बदलली तरी चंद्रावर मात्र ठरलेल्या वेळीच उतरणार चांद्रयान.

श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश) । सोमवारी दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी श्रीहरिकोटाच्या प्रक्षेपण तळावरून चांद्रयान-2 ने यशस्वीरीत्या अवकाशात झेप घेतली. चांद्रयान-2च्या अवकाशातील यशस्वी प्रक्षेपणाबरोबरच भारताने इतिहास घडवला आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर हे यान 7 सप्टेंबर रोजी लँड करणार आहे. याबरोबरच चंद्रावर यशस्वीरीत्या लँडिंग करणारा भारत चौथ देश होईल. यापूर्वी हा मान अमेरिका, रशिया व चीनला मिळालेला आहे. परंतु या देशांनी आजपर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवलेेले नाही. यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार पहिला देश होण्याचा मान भारताला मिळणार आहे.

तत्पूर्वी, शनिवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणाची रंगीत तालीम पूर्ण केली होती. इस्रोचे माजी प्रमुख ए. एस. किरण कुमार म्हणाले की, सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. आम्ही सोमवारच्या इव्हेंटसाठी तयार आहोत. इस्रोने गुरुवारी ट्विट केले होते की, चांद्रयान-2 ची लाँचिंग 15 जुलै रोजी रात्री 2.51 वाजता होणार होती, तांत्रिक अडचणींमुळे ती टाळण्यात आली. इस्रोने एका आठवड्याच्या आत सर्व तांत्रिक अडचणी दूर केल्या आहेत.

LIVE UPDATES

>> जीएसएलव्ही मार्क 3 एम 1 या प्रक्षेपकामध्ये N204 द्रवरूप इंधन भरण्याचे काम पूर्ण.

>> 

चांद्रयान-2 ची तांत्रिक माहिती...

44 मीटर लांब आणि 640 टन वजनी जीएसएलव्ही-एमके-3 रॉकेटला 'बाहुबली' आणि 'फॅट बॉय' नावही देण्यात आले आहे. चांद्रयानाचे वजन 3,870 किलो आहे. 375 कोटी रुपयांच्या जीएसएलव्ही-मार्क 3 रॉकेट 603 कोटी रुपयांच्या चांद्रयान-2 सोबत उड्डाण करेल. पृथ्वी आणि चंद्राच्या दरम्यानचे अंतर तब्बल 3.84 लाख किलोमीटर आहे. येथून चंद्रापर्यंतचा प्रदीर्घ प्रवास सुरू होईल. लँडर-विक्रम आणि रोव्हर-प्रज्ञान यांना घेऊन हे यान चंद्रापर्यंत जाईल. लँडर-विक्रम 6 किंवा 7 सप्टेंबर रोजी चंद्रावर पोहोचेल. यानंतर तेथून माहिती पाठवण्यास सुरुवात होईल.

15 जुलैच्या रात्री चांद्रमोहिमेला सुरुवात होण्याच्या 56 मिनिटे आधी इस्रोने ट्विट करून प्रक्षेपण पुढे ढकलल्याचे जाहीर केले होते. इस्रोचे असोसिएट डायरेक्टर (पब्लिक रिलेशन) बी. आर. गुरुप्रसाद म्हणाले होते की, लॉन्चिंगच्या ठीक आधी लॉन्चिंग व्हेइकल सिस्टिममध्ये बिघाड झाला होता. यामुळे चांद्रयान-2 ची लॉन्चिंग टाळण्यात आली होती. यानंतर शनिवारी इस्रोने ट्विट केले की, जीएसएलव्ही एमके3-एम1/चांद्रयान-2 ची लॉन्च रिहर्सल पूर्ण झाली आहे.

चांद्रयान-2 पृथ्वीची एक परिक्रमा कमी करणार
लॉन्चिंगची तारीख एका आठवड्याने पुढे ढकलूनही चांद्रयान 2 चंद्रावर आपल्या ठरलेल्या दिवशी 7 सप्टेंबरलाच पोहोचेल. यातील लँडर आणि रोव्हर यांनी आपल्या शेड्युलनुसार काम करावे म्हणून हे ठरलेल्या दिवशी पोहोचणे गरजेचे आहे. यामुळेच वेळ वाचवण्यासाठी चांद्रयान पृथ्वीची एक परिक्रमा कमी करणार आहे. यापूर्वी 5 परिक्रमा करणार होता, परंतु आता त्याऐवजी 4 परिक्रमा होतील. चांद्रयानाची लँडिंग ही चंद्रावर जेथे सूर्यप्रकाश सर्वात जास्त आहे, अशा ठिकाणी होणार आहे. 21 सप्टेंबरनंतर हा प्रकाश कमी होणार आहे. लँडर आणि रोव्हरला 15 दिवस काम करायचे आहे. यामुळे त्या ठिकाणी वेळेवर पोहोचणे गरजेचे आहे.

चांद्रयान 2 या भारतीय चांद्रमोहिमेत पहिल्यांदाच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या ठिकाणी आजपर्यंत कोणत्याही देशाने पोहोचण्याचा प्रयत्न केलेला नाही. चंद्राची अज्ञात माहिती मिळवणे आणि मानवतेला उपयोगी ठरणारे शोध लावणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या प्रयोगांच्या आणि अनुभवांच्या आधारावरच भविष्यातील चंद्रमोहिमांच्या तयारीत मोठे बदल आणण्याचा आहे. जेणेकरून येणाऱ्या काळात भावी मोहिमांमध्ये स्वीकारल्या जाणारे नवे तंत्रज्ञान निश्चित होण्यास मदत होईल.

भारत चंद्रावर का जात आहे?

पृथ्‍वीचा जवळचा उपग्रह चंद्र आहे. या माध्यमातून अंतराळात संशोधानाचे प्रयत्न केले जाऊ शकतात. याबाबतची आकडेवारीही एकत्र केली जाऊ शकते. भविष्यातील अंतराळ मोहिमांमध्ये वापरण्याचे तंत्रज्ञान आजमावण्याचे हे परीक्षण केंद्रही ठरणार आहे. चांद्रयान 2 ही मोहीम संशोधनाच्या नव्या युगाला प्रोत्साहन देणे, अंतराळाबाबत आपले ज्ञान वाढवणे आणि प्रौद्योगिकीतील प्रगतीला चालना देणे, वैश्विक ताळमेळ वाढवणे, संशोधनकर्त्यांना तसेच शास्त्रज्ञांच्या भावी पिढीला प्रेरणादायी ठरेल.

चांद्रयान 2  चा वैज्ञानिक उद्देश, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणे का गरजेचे?

चंद्र आपल्याला पृथ्वीच्या क्रमिक विकास आणि सौरमंडळाच्या पर्यावरणाची अविश्वसनीय माहिती देऊ शकतो. सध्या काही परिपक्व मॉडेल आहेत, परंतु चंद्राच्या उत्पत्तीच्या बाबतीत अधिक स्पष्टीकरणाची आवश्यकता आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरून याच्या संरचनेतील बदलांचा अभ्यास करण्यात मिळेल. चंद्राची उत्पत्ती आणि विकासाबाबतही अतिमहत्त्वाची माहिती गोळा करता येईल. तेथे पाणी असल्याचे पुरावे चांद्रयान 1 ने शोधले होते. आता चंद्राच्या किती भागात पाणी आहे, याचा शोध घेता येईल.

चंद्राचा दक्षिण ध्रुव विशेषत्वाने महत्त्वाचा आहे. कारण याचा बहुतांश भाग उत्तर ध्रुवाच्या तुलनेत अंधारात असतो. याच्या चहुबाजूंनी अंधारात असणाऱ्या या भागात पाणी असण्याची शक्यता जास्त आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय क्षेत्रातील शीत खड्ड्यांमध्ये (क्रेटर्स) प्रारंभिक सौरप्रणालीतील लुप्‍त जीवाश्मांचे रेकॉर्ड आहेत.

चांद्रयान-2 विक्रम लंडर आणि प्रज्ञान रोव्हरचा वापर करणार आहे. हे दोन खड्ड्यांमधील- मंज़िनस सी आणि सिमपेलियस एनच्या दरम्यान असलेल्या मैदानात जवळजवळ 70° दक्षिणी अक्षांशावर यशस्वीरीत्या लँडिंगचा प्रयत्न करणार आहे.

  • पहिली अंतराळ मोहीम जी चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय क्षेत्रावर यशस्वीरीत्या लँडिंगचे संचालन करेल.
  • पहिली भारतीय मोहीम, जी स्वदेशी तंत्रज्ञानाने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.
  • पहिली भारतीय मोहीम जी देशात विकसित प्रौद्योगिकीद्वारे चंद्राबाबत माहिती गोळा करेल.
  • चंद्राच्या पृष्ठभागावर रॉकेट उतरवणारा भारत चौथा देश बनेल.

लॉन्चर आणि स्पेसक्राफ्ट

लाँचर


GSLV Mk-III भारताचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली लाँचर आहे. हा पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा आहे.

ऑर्बिटर


ऑर्बिटर, च्रंदाच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करेल आणि पृथ्वी तसेच चांद्रयान 2च्या लँडर - विक्रममध्ये संकेतांची देवाणघेवाण करेल.

विक्रम लँडर


लँडर विक्रमला चंद्राच्या पृष्ठभागावर भारताचे पहिल्या यशस्वी लँडिंगसाठी डिझाइन करण्यात आले आहे.

प्रज्ञान रोव्हर


रोव्हर आर्टिफिशियल इंटेलिजन्सने संचालित सहा चाकी वाहन आहे. याचे नाव ''प्रज्ञान'' आहे. संस्कृत शब्द 'ज्ञान'वरून याचे नाव ठेवण्यात आले आहे.

मिशनची कालमर्यादा

> 18 सप्टेंबर 2008 - तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी चांद्रयान 2 मोहिमेला मंजुरी दिली. दरम्यानच्या काळात मोहिमेवर काम करण्यात आले.

> 9 जुलै 2019 ते 16 जुलै 2019 पर्यंत - लॉन्च विंडो

> 6 सप्टेंबर 2019 - चंद्रावर उतरणे

> चंद्रावर होणारे वैज्ञानिक प्रयोग - 1 चंद्र दिवस (म्हणजेच पृथ्वीवरचे 14 दिवस)

> कक्षेत ऑर्बिटरचे भ्रमण - 1 वर्षापर्यँत

पेलोडमधील यंत्रे व त्यांचे कार्य

1) चांद्रयान 2 विस्तृत क्षेत्र सॉफ्ट एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर
चंद्राच्या मौलिक रचनेची माहिती मिळवण्याकरिता.

2) इमेजिंग आय आर स्पेक्ट्रोमीटर
मिनरेलॉजी मॅपिंग आणि पाणी तसेच बर्फ असल्याची खात्री पटवणे.

3) सिंथेटिक एपर्चर रडार एल अँड एस बँड
ध्रुवीय क्षेत्राचे मानचित्रण आणि उप-पृष्ठभागातील पाणी तसेच बर्फाची खात्री पटवणे.

4) ऑर्बिटर हाय रिझॉल्यूशन कॅमेरा, 
हाय-रेज टोपोग्राफी मॅपिंग

5) चंद्राच्या पृष्ठभागाचा थर्मो-फिजिकल तापभौतिकी प्रयोग
तापीय चालकता आणि तापमानातील चढ-उतार मोजणे.

6) अल्फा कण एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर आणि लेझरचलित ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप
लँडिंग साइटच्या आसपास असलेल्या तत्त्वांचा आणि खनिजांच्या प्रमाणाचे विश्लेषण करणे.AM News Developed by Kalavati Technologies