राज्यातील 122 केंद्रांवर उद्यापासून तलाठी भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा

2 जुलै ते 26 जुलै 2019 या कालावधीत ई महापरीक्षा पार पडणार

मुंबई । महसूल विभागातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी येत्या 2 जुलै ते 26 जुलै 2019 या कालावधीत ई महापरीक्षा मार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यातील 122 केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्य शासनाने सर्व विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार महसूल विभागातील तलाठी संवर्गातील पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. या पदासाठी 2 जुलैपासून राज्यातील विविध केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे पूर्ण संचलन व कार्यान्वयन महा-आयटी विभागाच्या माध्यमातून ई-महापरीक्षा मार्फत होणार आहे. महापरीक्षा पोर्टलवरून घेतल्या जाणार्‍या परीक्षा सुरू असताना नियमांचे पालन केले जात आहे ना, काही गैरप्रकार होत नाही ना, यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षा नियंत्रक म्हणून व महा-आयटीच्या मुंबई येथील कमांड रुममध्ये परीक्षा नियंत्रक म्हणून प्रत्येकी एका अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आली आहे, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.
 
प्रत्येक परीक्षा केंद्रावर उमेदवाराने यापैकी एक मूळ फोटो ओळखपत्र आणणे अत्यावश्यक आहे.
 1. पॅन कार्ड
 2. पासपोर्ट 
 3. वाहन अनुज्ञप्ती 
 4. मतदान ओळखपत्र 
 5. मूळ फोटोसह राष्ट्रीयीकृत बॅक पासबुक 
 6. आधार कार्ड यांचा समावेश आहे. ओळखपत्र फेरफार करून दुसरा उमेदवार येऊ नये यासाठी फोटो ओळखपत्राची रंगीत झेरॉक्स, ई आधार कार्ड आणि फोटो ओळखपत्राची सॉफ्ट कॉपी वैध ओळखपत्र पुरावा म्हणून स्विकारली जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना उमेदवारांच्या हॉल तिकिटावर देण्यात आल्या आहेत. 
या परीक्षेसंदर्भात अधिक माहिती अथवा तक्रारींसाठी 1800 3000 7766 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला असल्याची माहिती मुंबई शहर व मुंबई जिल्हा उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कळविली आहे.


AM News Developed by Kalavati Technologies