रायगड (देवेंद्र दरेकर) । कोरोना महामारीमुळे मार्च महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते. या काळात शाळा, विद्यापीठेही बंद करण्याचे आदेश होते. आता अनलॉकच्या प्रक्रियेतील चौथा टप्पा सुरू झाला तरीही शाळा, विद्यापीठे उघडण्यास परवानगी नाही. केवळ ऑनलाइन शिक्षणाला मुभा देण्यात आली आहे.
शाळा व महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे. परंतु शैक्षणिक संस्था, विद्यापीठे बंद असून विविध सुविधांच्या नावाखाली विद्यार्थ्यांना भरमसाट फी आकारली जात असल्याचे समोर आले आहे. रायगड जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोनेरे येथे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण मिळत असून विद्यार्थ्यांकडून प्रवेश प्रक्रियेत जिम, ग्रंथालय, डेव्हलपमेंट फीच्या नावाखाली भरमसाट शुल्क आकारले जात असून अद्याप विद्यापीठ बंद असून इतर फीची आकारणी आमच्याकडून का केली जात आहे, असा सवाल विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू व कुलसचिव यांच्याशी एएम न्यूजच्या प्रतिनिधींनी भेटून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भेट नाकारली. विद्यार्थ्यांच्या फीबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला असून शासनाने त्वरित कारवाई करत याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.