करमाळा । देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे उद्योगधंदे पुर्णपणे बंद पडले. अशातच अनेकांचा रोजगार सुद्धा गेला. ऐकीकडे कामाला हात नाही, तर दुसरीकडे हाताला काम नसल्याने अनेक जण शहरातून आप-आपल्या गावाकडे स्थलांतरीत झाले. अशातच माढा तालुक्यातील दारफळ (सिना) या गावातील विशाल बारबोले या तरुणाला कोरोनाच्या काळात कारखान्यात पाच आकडी पगारावर नोकरी लागल्याने, त्यांच्या मित्र परिवाराने गावाच्या मुख्य चौकात मोठा फलक लावून आंनद साजरा केला.
विशालने आपल्या मेहनत आणि जिद्दीवर नोकरी मिळवल्याने, त्यांच्य़ा फोटोसह पगाराची रक्कम लिहुन त्याचा गावात कौतुक करण्यात आलं. पगाराची रक्कम जरी किरकोळ वाटत असली तरी, मैत्रीचं नातं या निमित्ताने समोर आलं आहे. नोकरी मिळाल्याने विशालचे आई वडील देखील आता मुलासाठी छोकरीच्या शोधात लागलेत. दारफळ गावचा रहिवासी असलेल्या विशालने दहावी उत्तीर्ण होऊन आयटीआयचा कोर्स पुर्ण केला होता. केवड/तुर्क पिंपरी येथील बबनराव शिंदे शुगर्स येथे विशाल कर्मचारी नोकरीस लागला.
अनेक वर्ष काम देखील केले. मात्र तिथे मिळणाऱ्या पगारावर तो समाधानी नव्हता. दुसरीकडे मोठा पगार अन् हुद्याच्या तो शोधात असायचा. अशातच आष्टी ता.मोहोळ येथे असलेल्या औदुंबरराव पाटील साखर कारखान्यात कर्मचारी भरती निघाली आणि विशाल तिथे गेला असून त्यांची क्रेन ऑपरेटर पदी निवड झाली. अनेक वर्ष मोठ्या पगारासाठी धडपडत असलेल्या आपल्या जिवलग मित्राला नोकरी लागल्याचे समजताच मित्र परिवाराने त्याचा गावातील मुख्य चौकात पगाराची रक्कम लिहुन अभिनंदन करण्यासाठी डिजीटल बॅनर्स लावलाय. या आगळ्या-वेगळ्या डिजीटल बॅनर्स गावासह परिसरात चर्चेचा विषय ठरतोय.