बारावीत आता कोणीही होणार नाही 'नापास', येणार नवा शेरा

फेब्रुवारी-मार्च 2020 च्या परीक्षेपासून नवा निर्णय लागू केला जाणार आहे.

मुंबई | राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या बारावी परीक्षेच्या गुणपत्रिकेतून 'अनुत्तीर्ण' हा शेरा पुसून टाकण्यात येणार आहे. हा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. दहावीसाठी चार वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही फेब्रुवारी-मार्च 2020 च्या परीक्षेपासून नवा निर्णय लागू केला जाणार आहे.

विद्यार्थी परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाले. तर त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शेरे पद्धती लागू करण्यात आली होती. 30 ऑगस्ट 2016 च्या आदेशानुसार ही शेरे पद्धती लागू करण्यात आली होती. आता हीच शेरे पद्धती बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू होणार आहे.

म्हणजेच जर बारावीचा विद्यार्थी एक-दोन विषयांमध्ये किंवा तीनपेक्षाही अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाला. तर फेरपरीक्षेस पात्र (एलिजिबल फॉर री-एक्झाम) असा शेरा गुणपत्रिकेत नोंदवण्यात येणार आहे. यावरुन 'नापास' हा शेरा आता मिटवला जाणार आहे. जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेमध्ये एक-दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षेस पात्र असा शेरा नोंदवण्यात येईल. तीनपेक्षा अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेमध्ये 'कौशल्य विकास अभ्याक्रमासाठी पात्र' असा शेरा नोंदवण्यात येईल.AM News Developed by Kalavati Technologies