तलाठी भरतीत गैरप्रकार, जिल्हाधिकाऱ्यांनी केला पर्दाफाश; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

डमी परीक्षार्थीमुळे मूळ परीक्षार्थींना गुणवत्ता यादीत स्थान मिळाले आहे, रॅकेट कार्यरत असल्याचे उघडकीस

अहमदनगर । जिल्हाधिकारी कार्यालय घेतलेल्या तलाठी व वाहनचालक पदाच्या भरतीत गैरप्रकार झाला आहे. मूळ परीक्षार्थींच्या जागेवर डमी परीक्षार्थी बसून परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा प्रकार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अंजली म्हस्के (बुलढाणा), विशाल इंगळे (यवतमाळ) व मंगेश दांडगे (जालना) हे तीन मूळ परीक्षार्थी तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे हे तपास करत आहेत.

तलाठी व वाहनचालक पदासाठी १२ जानेवारीला नगरमध्ये परीक्षा झाली. त्यासाठी ८०० परीक्षार्थी परीक्षेला बसले होते. तलाठी पदासाठी पात्र झालेले तीन परीक्षार्थी यांनी डमी परीक्षार्थी बसवून परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या लक्षात आले. आज सायंकाळी हया मूळ परीक्षार्थींना जिल्हाधिकारी कार्यालयात आणून तपासणी करण्यात आली.

परीक्षेच्या वेळेस महसूल विभागाने प्रत्येक परीक्षार्थीचे चित्रीकरण केले होते. या चित्रीकरणाची जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी आज सायंकाळी स्वतः तपासणी केली. मूळ परीक्षार्थींच्या आसन क्रमांकावर वेगळेच परीक्षार्थी पेपर देत असताना दिसत होते. त्यामुळे मूळ परीक्षार्थी हे परीक्षेला बसलेच नसल्याचे समोर आले. त्यातच या मूळ परीक्षार्थींकडे केलेल्या चौकशीत विसंगत माहिती पुढे आली आहे. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
डमी परीक्षार्थीमुळे मूळ परीक्षार्थींना गुणवत्ता यादीत स्थान मिळाले आहे. विशाल इंगळे हा गुणवत्ता यादीत अव्वल आहे. त्याला २०० पैकी १८२ गुण मिळाले आहेत. त्या खालोखाल अंजली म्हस्के व मंगेश दांडगे यांना प्रत्येकी १६० गुण मिळालेले आहेत. डमी परीक्षार्थींना मूळ परीक्षार्थींच्या जागी बसवण्यासाठी रॅकेट कार्यरत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे.AM News Developed by Kalavati Technologies