अलीबाबा अन् जॅक मा । निवृत्त होतोय ई-कॉमर्सचा किंग, कोट्यवधी तरुणांसाठी बनला प्रेरणा

...म्हणून जॅक मा यांची चित्रे चीनमधल्या घराघरांत टांगलेली आहेत. त्यांना धनदेवता मानलं जातं..

जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अलिबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा यांनी 10 सप्टेंबर रोजी निवृत्ती जाहीर केली. अमेरिका-चीनमधील व्यापारयुद्धामुळे वेगाने बदलणार्‍या उद्योग क्षेत्रातील अनिश्चिततेचा काळ असताना त्यांनी या पदावरून माघार घेतली आहे. त्यानी अध्यक्षपदावरून हटण्याच्या निर्णय वर्षभरापूर्वी घेतला होता. तथापि, ते अलिबाबाचे भागीदार सदस्य म्हणून कायम राहतील. हा 36 लोकांचा समूह आहे ज्यांना कंपनीच्या संचालक मंडळावर बहुसंख्य सदस्य नामित करण्याचा अधिकार आहे. जॅक मा यांची संपत्ती 41 अब्ज डॉलर्स आहे. त्यांना त्यांची अफाट संपत्ती शिक्षणावर खर्च करायची आहे.

जॅक मा (55) यांनी 1999 मध्ये अलिबाबाची स्थापना केली. चिनी निर्यातदारांना थेट अमेरिकन किरकोळ विक्रेत्यांशी जोडण्यासाठी त्यांनी अलिबाबा ई-कॉमर्स कंपनी तयार केली. यानंतर चीनच्या वाढत्या ग्राहक बाजारात पुरवठा वाढवण्यासाठी कंपनीने कामाची व्याप्ती वाढवली. जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत एकूण उलाढालीत कंपनीच्या देशांतर्गत व्यवसायात 66 टक्के हिस्सा होता.

जॅक मा... असा सुरू झाला उद्योजकाचा प्रवास
ते 1970 चे दशक होते. माओच्या सांस्कृतिक क्रांतीच्या भयंकर टप्प्यातील आठवणी विसरायचा चीन प्रयत्न करत होता. डेंग जिओपिंग यांच्या नेतृत्वात आर्थिक सुधारणांचे युग सुरू झाले. देशाचे दरवाजे उघडत होते. चीन पाहण्यासाठी आणि समजण्यासाठी मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक येत होते. त्याच वेळी एका 12 वर्षांच्या मुलाने मनात एक निश्चय केला.

वादळ आले, पाऊस पडला किंवा बर्फ पडला, तरी दररोज सकाळी एक 12 वर्षांचा मुलगा आपल्या अंथरुणावरून उठायचा आणि 40 मिनिटे सायकल चालवून हांग्जो सिटी लेक शहराजवळील हॉटेलमध्ये जायचा. त्याचे हे वेड त्याच्या नवीन प्रेमासाठी होते. आणि त्याची प्रेयसी होती एक परदेशी भाषा - इंग्रजी. इंग्रजी सुधारण्यासाठी जॅक मा नावाचा हा मुलगा सलग 8 वर्षे येथे आला. यादरम्यान तो पर्यटकांना फिरवायला न्यायचा. त्यांच्या पद्धती त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करायचा. या इंग्रजीच्या जोरावरच तो महाविद्यालयात इंग्रजीचा शिक्षक झाला.

जॅक मा यांना त्यांचे पहिले प्रेम म्हणजेच इंग्रजीने जग समजण्यास मदत केली. त्यांनी परदेशी लोकांचे कार्यपद्धती आत्मसात केली आणि स्वत:ची विचार करण्याची पद्धत सुधारली. त्यांचे दुसरे प्रेम होते - इंटरनेट. 1995 मध्ये जॅक मा दुभाषी म्हणून अमेरिकेच्या सिएटल शहरात गेले आणि तेथे त्यांनी पहिल्यांदा इंटरनेट पाहिले. जॅक माने एकदा आपली कथा सांगताना प्रसिद्ध मॅगझिन 'आंत्रप्रेन्योर'ला सांगितले होते की,

"सिएटलमध्ये पहिल्यांदाच एका मित्राने मला इंटरनेट दाखवले. तेव्हा पहिल्यांदा मी याहूच्या सर्च इंजिनवर 'बिअर' हा शब्द शोधला. परंतु मला कोणताही चिनी डेटा सापडला नाही. मग आम्ही एक वेबसाइट सुरू करण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्याचे नाव चायना पेज म्हणून रजिस्टर्ड केले."

जॅक मा म्हणतात, "मी दोन हजार डॉलर्सच्या कर्जासह एक कंपनी स्थापन केली. परंतु मला पर्सनल कॉम्प्युटरबद्दल किंवा ई-मेलविषयी काहीही माहिती नव्हते. मी कीबोर्डला कधीही स्पर्श केला नाही. म्हणूनच मी म्हणतो की मी आंधळ्या वाघाच्या पाठीवर आंधळा मनुष्य होतो.''

जॅक मा यांनी चायना टेलिकॉमसह जॉइंट व्हेंचर सुरू केलं. परंतु ते चाललं नाही. मग जॅक मा यांनी स्वत:चे ई-कॉमर्स बनवण्याचे स्वप्न पाहण्यास सुरुवात केली. 1999 मध्ये त्यांनी आपल्या अपार्टमेंटमधील 18 जणांना एकत्र केले आणि त्यांच्याशी आपल्या स्वप्नाबद्दल चर्चा केली. यातून 80,000 डॉलर्स जमा झाले. ग्लोबल कंपनी उभारण्याचा त्यांचा हेतू होता. म्हणूनच या नावदेखील ग्लोबल ठेवले- अलिबाबा.

अलिबाबाची जादू
यानंतर जॅक मा यांनी मागे वळून पाहिले नाही. अलिबाबाच्या जादूनं लवकरच अवघ्या विश्वाला व्यापून टाकलं. अलिबाबा जगातील आघाडीच्या ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी म्हणून उदयास आली. 1999 मध्ये अलिबाबाची डिजिटल बाजारपेठेतून सुरुवात झाली, परंतु आज त्यांनी आपले साम्राज्य ई-कॉमर्स, ऑनलाइन बँकिंग, क्लाऊड कम्प्यूटिंग, डिजिटल मीडिया आणि करमणूक उद्योगात विस्तारले आहे. चीनमध्ये ट्विटरप्रमाणेच लोकप्रिय वेइबोमध्ये अलीबाबाचा वाटा आहे. हाँगकाँग येथून निघणाऱ्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्टचेदेखील ते भागीदार आहेत.

एका साध्या इंग्रजी शिक्षकापासून ते जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपनीपैकी एक असलेल्या कंपनीची मालकी हा जॅक मा यांचा प्रवास अद्भुत आहे. ना अनुभव, ना भांडवल, ना व्यवसाय दृष्टी. परंतु दोन गोष्टींमुळे ते ई-कॉमर्सचे किंग बनले. एक म्हणजे- जगाला समजण्याची त्यांची आवड आणि दुसरी- जिद्द. या जिद्दीनेच त्यांना शून्यापासून शिखरावर आणले. आज जॅक मा यांची चित्रे चीनमधल्या घराघरांत टांगली आहेत. त्यांना धनाची देवता मानले जाते. आज जॅक मा एक लिव्हिंग-लीजेंड बनले आहेत आणि त्यांची कहाणी आशियाई देशांमधील तरुणांसाठी एक प्रेरणास्रोत.AM News Developed by Kalavati Technologies