चार दिवसात दोन राजकीय कार्यकर्त्यांच्या आत्महत्या, एक भाजपचा दुसरा काँग्रेसचा

बुलडाणा जिल्ह्यात चार दिवसात दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या दोन कार्यकर्त्यांनी स्वतःला गळफास लावून आत्महत्या केल्या

बुलडाणा । बुलडाणा जिल्ह्यात चार दिवसात दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या दोन कार्यकर्त्यांनी स्वतःला गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत, या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात जानेवारी 2015 पासून ते सप्टेंबर 2019 पर्यंत पाच वर्षात 1265 लोकांनी आत्महत्त्या केल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलेले असताना सर्वच पक्षांचा जोमात प्रचार सुरू आहे त्या अनुषंगाने 13 ऑक्टोबर रोजी मलकापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होण्याच्या काही तास आधी जळगाव जामोद मतदार संघातील खातखेड येथील 35 वर्षीय राजेश तलावरे या भाजप कार्यकर्त्याने "पुन्हा आनुया आपले सरकार" छापलेली टी शर्ट घालून आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या आत्महत्त्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही, तलावरे हा कामगार मंत्री डॉ संजय कुटे यांचा पक्ष कार्यकर्ता होता. मुख्यमंत्र्यांच्या सभे आधी भाजप कार्यकर्त्यानेच केलेल्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली तर याचे कोलीत विरोधी पक्षाने हाती घेतले होते, तर आत्महत्या केलेला तरुण हा शेतकरी नसून कौटुंबिक वादातून राजेश तलावरे यांनी आत्महत्या केल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

या घटनेला तीन दिवस झाले असतांनाच पुन्हा एकदा चिखली मतदार संघातील धाड येथील सतीश मोरे या 20 वर्षीय काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसची छापलेली टी शर्ट घालून गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. चिखली मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार राहुल बोन्द्रे यांनी पंजा चिन्हासह छापलेली
"मी राहुल भाऊ समर्थक" ही टी शर्ट घालून सतीश मोरे या तरुणाने आपले जीवन संपवले आहे. एकीकडे प्रचाराने राजकीय वातावरण तापलेले असतांना या दोन्ही घटने कडे सर्वच राजकीय पक्षकांडून दुर्लक्ष होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.AM News Developed by Kalavati Technologies